

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चार खासगी रुग्णालयांवर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंगीकृत समितीने कठोर कारवाई करत या हॉस्पिटलमधील योजना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्या आहेत. यामध्ये कोल्हापुरातील अॅस्टर आधार व सनराईज हॉस्पिटल, इचलकरंजीतील अलायन्स आणि गडहिंग्लजच्या स्वराज्य हॉस्पिटलचा समावेश आहे.
या रुग्णालयांकडून महात्मा फुले योजनेतील रुग्णांकडून अनधिकृत पैसे आकारणे, तसेच उपचारांत दिरंगाई व टाळाटाळ करणे अशा स्वरूपाच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
यापैकी दोन रुग्णालयांतील योजना येत्या दोन दिवसांत पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यामधील एका नामांकित रुग्णालयावर यापूर्वी अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही असाच प्रकार सुरू राहिल्याने दुसर्यांदा कारवाई करण्यात आल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा योग्य लाभ रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकार गंभीर असून, योजनेचा गैरवापर करणार्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.