Kolhapur Water scarcity : पाण्‍यासाठी रोज वणवण... हॉटेलमध्‍ये मात्र उधळण

जिल्‍ह्यात दररोज ६० हजार लिटर्स पाण्याची नासाडी : सोप्या उपायांनी होऊ शकते बचत
Kolhapur Water scarcity
पाण्‍यासाठी रोज वणवण... हॉटेलमध्‍ये मात्र उधळण
Published on
Updated on

कोल्हापूर : बदलत्या जीवनशैलीमुळे आज हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खानावळींमध्ये (मेस) जेवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, यांसारख्या खाद्यपदार्थ केंद्रांवरून दररोज पिण्याच्या आणि इतर वापराच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांवर हॉटेल्स आणि खानावळी आहेत, त्यातून दररोज तब्बल ५०-६० हजार लिटर्स पाण्याची केवळ निष्काळजीपणामुळे नासाडी होत आहे. पाण्याचे हे वाढते अपव्यय रोखण्यासाठी आता हॉटेल चालक आणि ग्राहक दोघांनीही सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.

कशी होतेय पाण्याची नासाडी?

एका हॉटेल किंवा खानावळीत ग्राहकाला पाण्याचा ग्लास भरून दिला जातो. बहुतांश ग्राहक अर्धेच पाणी पितात आणि उरलेले बेसिनमध्ये ओतले जाते. ग्लासमध्ये साधारण १०० मिली पाणी वाया गेले, तरी एका हॉटेलमध्ये दिवसाला शेकडो लिटर्स शुद्ध पाणी नाल्यात वाहून जाते. भाज्या आणि भांडी धुताना नळ चालू ठेवणे, स्वच्छतागृहातील गळके नळ आणि फरशी पुसण्यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होतो. एका हॉटेलमध्ये कमीत कमी १० लिटर्स पाणी रोज वाया जाते. जिल्ह्यात रोज ५० हजार लिटर्स वाया जाते.

टंचाई रोखण्यासाठी सोपे उपाय

  • हा पाण्याचा अपव्यय थांबवणे अत्यंत सोपे आहे. हॉटेल चालकांनी केवळ खालील छोट्या सुधारणा केल्या, तर हजारो लिटर्स पाणी वाचवता येऊ शकते

  • ‘हाफ ग्लास’ पाणी पद्धत: ग्राहकांना टेबलवर आल्यावर सुरुवातीला फक्त अर्धा ग्लास पाणी द्यावे. त्यांना अधिक हवे असल्यास पुन्हा पाणी वाढावे. यामुळे पिण्याच्या पाण्याची ५० टक्के बचत होऊ शकते.

  • उरलेल्या पाण्याचा पुर्नवापर: ग्राहकांच्या ग्लासमध्ये उरलेले पाणी फेकून न देता ते एका वेगळ्या बादलीत जमा करावे. या पाण्याचा वापर हॉटेलमधील झाडांना घालण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी करावा.

  • नळांना ‘ॲरेटर’ बसवणे: वॉश बेसिन आणि किचनमधील नळांना पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणारे ‘ॲरेटर’ बसवावेत. यामुळे पाण्याचा वेग योग्य राहतो, वापर कमी होतो.

  • गळती रोखणे: हॉटेलमधील किंवा स्वच्छतागृहातील कोणतेही नळ अथवा फ्लश गळत असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करावी.

  • ग्राहकांचे प्रबोधन: प्रत्येक टेबलवर पाण्याचे महत्त्व सांगणारे छोटे फलक लावावेत, जेणेकरून ग्राहकही पाणी वाया घालवणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news