

विशाळगड : ऐतिहासिक किल्ले विशाळगड येथील उरूस आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पशुहत्या किंवा पशुबळीला सक्त मनाई केल्याची माहिती तहसीलदार सीमा सोनवणे व पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्मारकाचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी पुरातत्त्व विभागाने कुर्बानी व महाप्रसादासाठी ‘नाहरकत प्रमाणपत्र’ नाकारले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 27 मे ते 1 जून 2026 या कालावधीत गडावर कडक बंदोबस्त तैनात असेल. आंबा मार्ग, पावनखिंड मार्ग आणि केंबुर्णेवाडी येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली असून, येथे तसेच पायथ्याशी पर्यटकांची सखोल तपासणी केली जाईल. भाविकांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सोनवणे यांनी केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडावर पोलिस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, असे शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सांगितले.