

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक गस्त घालत असताना भूसुरुंगाचा स्फोट होऊन शहापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील जवान अर्जुन रामचंद्र जाधव (वय ३०) आणि विक्रम बाळकृष्ण चव्हाण (मूळ रा. गोंडोली, ता. शाहूवाडी सध्या रा. ऐरोली, नवी मुंबई ) हे शहीद झाले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.
नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवान नियमित गस्त घालत असताना जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव गंभीर जखमी झाले. इतर जवानांनी प्रसंगावधान राखत त्वरित बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील जवानांना हेलिकॉप्टर आणि विशेष लष्करी वाहनांच्या मदतीने श्रीनगरमधील बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
चव्हाण शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव लवकरच गावी आणण्यात येणार आहे. अर्जुन जाधव हे २०१६-१७ मध्ये लष्करात भरती झाले होते. २०२४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. अर्जुन जाधव यांनी यापूर्वी पुणे येथे कार्यरत होते आणि मागील काही वर्षांपासून ते जम्मू - काश्मीरमध्ये देशसेवा बजावत होते.
चव्हाण यांच्या ऐरोली येथील निवासस्थानी शोकाकुल वातावरण आहे. देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या आपल्या मुलाने कर्तव्य बजावताना बलिदान दिल्याचा अभिमान असला, तरी त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.