

कोल्हापूर : पाणी उपसाच बंद झाल्याने कोल्हापूर शहरात मंगळवारी दिवसभर पाण्यासाठी अक्षरश: ठणठणाट सुरू होता. अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, तेही नियोजन पूर्णपणे कोलमडून गेले होते. बुधवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने नद्याही तळ गाठू लागल्या आहेत. त्यात मान्सूनने दडी मारल्याने जिल्हावर टंचाईचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत.
पंचगंगा आणि भोगावती नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने मंगळवारी सकाळपासूनच कोल्हापूर शहरासाठी केला जाणारा पाणी उपसा बंद झाला. यामुळे शहरातील पाणी टाक्यांत असलेल्या पाण्यावरच शहरात वितरणाची कसरत सुरू झाली. यामुळे काही भागात तर दिवसभर पाण्याचा टिपूसही नव्हता
नागरिकांनी नगरसेवक, अधिकाऱ्यांना भंडावून सोडले
सकाळपासूनच पाणी नसल्याने नागरिकांनी नगरसेवक, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून अक्षरश: भंडावून सोडले. वाढता उष्मा, त्यात घरात पाणीच नसल्याने नागरिक हैराण झाले होते. वारंवार फोन करूनही अनेक भागांत टँकर पोहोचले नाहीत.
काही भागांत टँकरने पाणीपुरवठा
पाणी उपसा झाला नसल्याने अनेक भागांत पाणीटंचाई होती. अशा भागात महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. मात्र, सर्वच भागांत पुरवठा करताना महापालिका प्रशासनाची दमछाक झाली. ज्या भागात टँकर पोहोचत होता, त्या भागात अवघ्या अर्धा तासातच तो रिकामा होत होता.
कळंबा उपसाही आठवड्यात बंद
कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ व परिसरात कळंबा तलावातून पाणीपुरवठा होताे. परंतु, कळंबा तलावाचीही पाणी पातळी कमी झाली आहे. ४ फूट पाणी पातळी झाल्यानंतर तलावातून उपसा बंद होताे. आठवड्यानंतर कळंबा तलावातूनही पाणी उपसा बंद होण्याची शक्यता आहे.
टँकर आहेत; पण पाणीच नाही
महापालिकेकडे स्वतःचे ४ टँकर आहेत. प्रशासनाने आणखी ५ टँकर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. एकूण ९ टँकरद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, नद्यांत पाणीच नसल्याने पुरवठा करायचा कसा? असा प्रश्न आहे. कसबा बावडा व संभाजीनगर फिल्टर हाऊस येथे संपमध्ये शिल्लक असलेले पाणी टँकरमध्ये भरून काही प्रमाणात मंगळवारी दिवसभर पुरवठा सुरू होता.