कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईनचा उपसा बंद होऊन पाच दिवस होत नाहीत, तोपर्यंत पंचगंगा आणि भोगावती नदीची पाणी पातळी कमालीची कमी झाल्याने शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या तीनही केंद्रांतून शहरासाठी होणारा उपसा मंगळवारी बंद राहिला. यामुळे कोल्हापूर शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. दूधगंगा नदीचीही पाणी पातळी घटल्याने कागल पंचतारांकित, गोकुळ शिरगाव आणि शिरोली या तीनही औद्योगिक वसाहती व कोल्हापूर विमानतळाचाही पाणीपुरवठा दोन दिवसांपासून ठप्प झाला आहे. शिरोळ तालुक्यातही उपसाबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दडी मारलेला मान्सून लवकर बरसला नाही तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होण्याची भीती आहे.
कोल्हापूर शहराला सध्या थेट पाईपलाईनमधून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दूधगंगा धरणातील पाणी कमी झाल्याने ११ जूनपासून पाणी उपसा बंद झाला. यामुळे शहरासाठी आवश्यक पाण्याचा उपसा पंचगंगा नदीवरील शिंगणापूर आणि भोगावती नदीवरील नागदेववाडी व बालिंगा या तीन केंद्रांवरून सुरू होता. या तीनही ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पाणी पातळी ५३५ मीटर इतकी आवश्यक असते. मात्र, सोमवारी दुपारपासून या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत गेली. पाणी पातळी ५३३.८० मीटरपर्यंत (सुमारे ५ फूट) कमी झाली. यामुळे मंगळवारी सकाळपासून या तीनही केंद्रांवरील उपसा बंद झाला.
पाणी उपसाच बंद झाल्याने प्रशासनाची प्रचंड धांदल उडाली. पाणीपुरवठा टाक्यांतील पाण्याचे वितरण करताना दमछाक झाली. परिणामी शहराच्या अनेक भागात दिवसभर पाण्याचा ठणठणाट होता. काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. प्रशासनाने जलसंपदा विभागाशी संपर्क साधत पाणी उपसा केंद्रांतील पाणी पातळी वाढावी याकरिता धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली. त्यानुसार विसर्ग वाढवण्यात आला. मात्र, हे पाणी उपसा केंद्रापर्यंत पोहोचण्यास बुधवार उजाडणार असून उपसा करून ते नागरिकांना मिळेपर्यंत गुरुवार उजाडेल अशी स्थिती आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता शहरात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतील, अशीच शक्यता आहे.
शिरोळमध्ये उपसाबंदी
जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या सरासरी केवळ २५ ते ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही दूधगंगा (काळम्मावाडी) धरणात अवघा ८.७८ टक्के साठा राहिल्याने चिंता वाढली आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण ते राजापूर बंधारा दरम्यान शिरोळ तालुक्यात सिंचन व औद्योगिक पाणी योजनांवर तातडीने उपसाबंदी लागू केली आहे. महावितरणला या योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उद्योगधंदे बंद ठेवण्याची वेळ
दूधगंगा नदीतील पाणीपातळी गंभीररीत्या घटल्याने सिद्धनेर्ली केंद्रावरून होणारा तीनही एमआयडीसीचा ४१० लाख लिटरचा दैनंदिन उपसा बंद झाला आहे.
पंचगंगा अवघ्या सहा फुटांवर
गेल्या सहा दिवसांपासून पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाली. मंगळवारी पाणी पातळी केवळ सहा फूट इतकी होती. पंचगंगा नदी घाटावरील बहुतांशी मंदिरे खुली झाली आहेत. राजाराम बंधाऱ्याचा काही भाग वगळता बहुतांशी भाग कोरडा पडला आहे.