

कोल्हापूर : नूतनीकरण केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण ९ ऑगस्टला करण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. त्या दृष्टीने सर्व सुविधा व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी (दि. ३०) दिली. दरम्यान, हेरिटेज समितीच्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा कामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष स्थळावर आवश्यक असलेल्या काही मागण्या हेरिटेज समितीच्या अध्यक्षांनी महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे सादर केल्या.
केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी सुकाणू समितीच्या बैठकीनंतर महापौर निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत रंगकर्मी, हेरिटेज समितीचे प्रतिनिधी, नाट्यकर्मी व कलाकारांची आढावा बैठक झाली. बैठकीत रंगकर्मींनी मांडलेल्या सुमारे ९० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागण्या लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. भारूड यांनी दिल्या. या बैठकीत रंगकर्मींनी नाट्यगृहातील विविध सुविधांबाबत सूचना व मागण्या मांडल्या. यापैकी ज्या बाबींमध्ये तत्काळ दुरुस्ती करणे शक्य आहे, त्या तत्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन महापौर निकम यांनी दिले.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, दीपा ठाणेकर, अनुराधा खेडकर, आदिल फरास, प्रा. जयंत पाटील, विजयसिंह खाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, अनुराधा वांडरे उपस्थित होते.