Prakash Awade : भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही; विरोधकांसोबत जाणाऱ्यांना उत्तर देऊ

माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा बैठकीत इशारा
Prakash Awade
प्रकाश आवाडे
Published on
Updated on

इचलकरंजी : भाजपमध्ये आवाडे आणि हाळवणकर यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मात्र पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरू असल्याचा आरोप माजी आ. प्रकाश आवाडे यांनी केला आणि पक्षातील कार्यकर्त्यांनाच खडे बोल सुनावले. मी शांत असलो तरी सर्वांवर लक्ष आहे. विरोधकांसोबत जाणाऱ्यांना वेळेत उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

शहरात काही दिवसांपासून आवाडे-हाळवणकर गटात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने आवाडे यांनी दोन्ही नेते एकत्र असल्याचे स्पष्ट करत पक्षातील काही कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

बैठकींना आम्हाला बोलावले जात नाही, मात्र पक्षाच्या विरोधात काम करणारेच नियोजनात पुढे दिसतात, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रोसेसधारकांचा प्रश्न, खर्चीवाले यंत्रमागधारकांचे आंदोलन आदी विषयांवरही स्पष्ट भूमिका मांडली. कार्यकर्त्यांना कानपिचक्या देतानाच काहींवर उपरोधिक टोलेही लगावले. त्यामुळे बैठकीतील वक्तव्यांची राजकीय वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती. यावेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील पाच वर्षे भाजपचाच महापौर

महापालिकेत पुढील पाच वर्षे भाजपचाच महापौर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षविरोधी हालचालींची दखल घेतली जाईल, असे स्पष्ट केले. कोणी विरोधकांना सोबत घेऊन काम करत असेल, तर मलादेखील विरोधक एकत्र करायला वेळ लागणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news