

इंद्रजित शिंदे
पन्हाळा : पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून रुग्णसेवेत अक्षम्य दुर्लक्ष आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर शिवाजी टोणपे यांना राज्य शासनाने तातडीने निलंबित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने २० एप्रिल रोजी या कारवाईचा अधिकृत आदेश निर्गमित केला असून, या निर्णयामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. टोणपे हे कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या काळात रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रकृती खालावली होती आणि त्याला तातडीने कोल्हापूरला हलवावे लागले होते. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने सखोल चौकशी केली होती. या चौकशीत डॉ. टोणपे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे उल्लंघन केल्याचे आणि रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक कामात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट झाले.
शासकीय आदेशानुसार, निलंबन कालावधीत डॉ. टोणपे यांचे मुख्यालय पन्हाळ्यावरून बदलून जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे करण्यात आले आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना हे मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, या काळात त्यांना कोणतीही खाजगी नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जर या नियमांचे उल्लंघन झाले, तर ते अधिक कठोर कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेशात बजावण्यात आले आहे.
निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाणार असला, तरी त्यांच्याविरुद्ध आता स्वतंत्रपणे विभागीय चौकशीही सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांच्या स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आला आहे. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर या कारवाईमुळे जरब बसली असून, रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्यांसाठी हा एक मोठा इशारा मानला जात आहे. या निर्णयाचे पन्हाळा परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.