

शिरढोण : पंचगंगा नदी प्रदुषणाच्या प्रश्नावर शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी (दि.२२) झालेल्या संयुक्त शेती पाहणीत टाकवडे (ता.शिरोळ) येथील कुलकर्णी शाळेजवळ पाईपलाईनद्वारे सीईटीपीचे सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची नोंद अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात घेतल्यानंतर पाहणीस्थळी वातावरण तणावपूर्ण बनले आणि वादावादीसह अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सीईटीपीचे पाणी शेतीत सोडले जात असल्याच्या दाव्याची खातरजमा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, आंदोलक आणि प्रक्रिया उद्योग मालक यांच्या उपस्थितीत सकाळपासून पाहणी सुरू होती. दिवसभरात सुमारे ९० एकर क्षेत्राची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बहुतांश क्षेत्र रिकामे असून तेथे आजपर्यंत पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले. केवळ सुमारे २५ एकर क्षेत्रातच पाण्याचा वापर होत असल्याचे आढळले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कुलकर्णी शाळेजवळून सीईटीपीचे सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात असल्याचे समोर आल्यानंतर आंदोलकांनी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. यावेळी काही कामगारांनी दादागिरी करत पाहणी बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे उर्वरित सुमारे २० एकर क्षेत्राची पाहणी थांबविण्यात आली. पाहणीदरम्यान झालेल्या वादावादीत काही जणांनी अंगावर धावून जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केला.
पाहणी दरम्यान नाष्टा करण्यासाठी टाकवडे येथे जात असताना त्यांच्या गाडीचा काहीजणांनी पाठलाग करून दादागिरी करत वाद घातल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला. दरम्यान वातावरण तणावपूर्ण बनले होते. उर्वरित क्षेत्राची पाहणी मंगळवारी पोलिस बंदोबस्तात करण्यात येणार असून त्यानंतरचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.