Kolhapur News : नागावच्या ग्रामपंचायत सदस्या मोसमी कांबळे यांचे निधन, किरकोळ आजारावर उपचार सुरू असताना ब्रेन स्ट्रोकने केला घात

आई घरी परतलीच नाही... चिमुरड्यांचा आक्रोश
Kolhapur News: Nagaon Gram Panchayat Member Mosami Kamble Dies
Published on
Updated on

नागाव : अत्यंत हसऱ्या, अबोल स्वभावाच्या आणि लोकसेवेचा ध्यास घेतलेल्या नागाव गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मोसमी अमोल कांबळे (वय ४६) यांची मृत्यूशी सुरू असलेली १५ दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. गर्भाशयाच्या एका किरकोळ आजारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या मोसमी यांना उपचारादरम्यान अचानक ब्रेन स्ट्रोक आला आणि त्या कोमात गेल्या. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नागाव परिसरात आणि राजकीय-सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

किरकोळ आजारपण अन् काळाचा घाला

मोसमी कांबळे यांना गर्भाशयाच्या किरकोळ त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार व्यवस्थित सुरू असतानाच अचानक उद्भवलेल्या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. ब्रेन स्ट्रोकच्या तीव्र आघाताने त्या थेट कोमात गेल्या. गेल्या १५ दिवसांपासून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते, तर कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्या सुखरूप घरी परततील या आशेवर प्रार्थना करत होते. मात्र, काळाने घातलेल्या या अनपेक्षित घालापुढे वैद्यकीय प्रयत्न आणि सर्वांच्या प्रार्थना अपुऱ्या पडल्या.

नागाववर शोककळा

मोसमी कांबळे या केवळ ४६ वर्षांच्या होत्या. नागाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या म्हणून त्यांनी नेहमीच गावच्या विकासात आणि नागरिकांच्या सुख-दुःखात पुढाकार घेतला होता. आपल्या शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अल्पावधीतच नागावच्या ग्रामस्थांमध्ये हक्काचे स्थान निर्माण केले होते. एका किरकोळ उपचारासाठी गेलेल्या आपल्या लोकप्रतिनिधीचा असा करुण अंत होईल, यावर अजूनही ग्रामस्थांचा विश्वास बसत नाही.

नागाव हे मोसमी यांचे आजोळ. त्यांचे बालपण नागावातच गेले होते आणि येथेच नात्यात त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले असून, एक दहावीत तर दुसरा सातवीत शिकत आहे. घटनेच्या वेळी ते दोघेही शाळेत गेले होते. घरी आल्यावर त्यांनी आईसाठी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनाच अश्रू अनावर झाले.

त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले. एका कर्तबगार महिलेच्या अशा अकाली जाण्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण नागाव अश्रूसागरात बुडाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news