कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येक प्रभागात एक सर्वसाधारण, एक नागरिकांचा मागासवर्ग, दोन महिला उमेदवारांना संधी मिळण्याची किमया साधली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनुसूचित जातीच्या 11 जागा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षित झाल्या. विशेषतः, पाच प्रभागांत प्रत्येकी दोन सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे रणांगण आपोआपच सर्वांसाठीच खुले झाले आहे. महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, विविध पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
एकूण वीस प्रभागांमधून 81 नगरसेवकांची निवड होणार असून, यामध्ये 11 अनुसूचित जाती, 21 नागरिकांचा मागासप्रवर्ग, 41 महिलांसाठी जागा आरक्षित केल्या आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता महापालिकेने शासकीय विश्रामगृहाजवळील शाहू सभागृहात या आरक्षण सोडतीला सुरुवात केली. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे, सहा. आयुक्त उज्ज्वला शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड आदींच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. व्यासपीठावर प्रवर्ग निहाय स्वतंत्र बरण्या ठेवल्या होत्या, तर आरक्षण सोडत काढण्यासाठी गोल फिरणाऱ्या रोलची व्यवस्था केली होती. प्रत्येक प्रवर्गाच्या चिठ्ठ्या करून त्यामध्ये टाकून तो रोल फिरविण्यात येत होता. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांमार्फत चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर केले जात होते.
अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जागा आरक्षित करताना प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल, अशा प्रभागातून सुरुवात करून उतरत्या क्रमांकाने येईल तसे 11 प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 4-अ, 18-अ, 17-अ, 13-अ, 15-अ, 1-अ, 11-अ, 19-अ, 2-अ, 6-अ, 20-अ यांचा समावेश होता. त्यानंतर या 11 प्रभागांतील सहा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. 11 प्रभागांचे क्रमांक असलेल्या कागदाचे रोल तयार करण्यात आले. ते तेथे असणाऱ्या अनुसूचित जाती असे लिहिलेल्या बरणीमध्ये टाकून त्यातून सहा चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार प्रभाग क्रमांक 18-अ, 20-अ, 11-अ, 17-अ, 4-अ, 13-अ हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले.
नागरिकांचा मागासवर्ग यासाठी 21 जागा आरक्षित करायच्या होत्या. महापालिकेच्या प्रभागांची संख्या 20 इतकी आहे. त्यामुळे 1 ते 19 या प्रभागांत प्रत्येक 1 नागरिकांचा मागासप्रवर्गांसाठी आरक्षण टाकण्यात आले, तर 20 क्रमाकांच्या प्रभागातून पाच नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने तेथे आणखीन एक जादाचे नागरिकांचा मागासप्रवर्गाचे आरक्षण टाकण्यात आले. 11 प्रभागांत नागरिकांचा मागासवर्ग महिलासांठी जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये 1-ब, 2-ब, 6-ब, 8-अ, 11-ब, 13-ब, 14-अ, 15-ब, 18-ब, 19-ब, 20-ब.
महापालिकेतील एकूण 20 प्रभागांतील 81 जागांपैकी 25 जागा खुल्या आहेत. प्रत्येक प्रभागात 1 जागा याप्रमाणे 20 जागा खुल्या ठेवण्यात आल्या. तर अन्य पाच जागा प्रभाग क्रमांक 8, 11, 13, 14 आणि 18 क्रमाकांच्या प्रभागात ठेवण्यात आल्या. त्यामुळे या पाच प्रभागांतून सर्वसाधारणसाठी प्रत्येक दोन जागा खुल्या राहिल्या. त्यामुळे प्रत्येक प्रभागासोबतच खुल्या दोन जागा असणाऱ्या या प्रभागातून लक्षवेधी लढती होणार आहेत.
आरक्षणाचे हे प्रारूप 17 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व सूचना सादर करण्यासाठी 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, दुपारी 3 हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल.
एकूण प्रभाग 20 सदस्य संख्या 81
अनुसूचित जाती-11 (पैकी 6 महिला)
नागरिकांचा मागासप्रवर्ग-21 (पैकी 11 महिला)
सर्वसाधारण-49
सर्वसाधारण महिला-24
सर्वसाधारण खुले-25
एकूण लोकसंख्या
5 लाख 49 हजार 236
अनुसूचित जाती लोकसंख्या
72005
अनुसूचित जमाती लोकसंख्या
2989