

कोल्हापूर : पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी यात्रेचा शनिवार, २५ जुलै मुख्य दिवस असला तरी २० ते ३० जुलै या कालावधीत भाविकांना ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे २२५ जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गावांतून जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. ४० किंवा अधिक प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून बसची मागणी केल्यास त्यांना गावातून थेट यात्रेच्या ठिकाणी आणि तेथून परत गावापर्यंत ये-जा करण्यासाठी जादा बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंढरपूर यात्रेच्या प्रवासातही एस.टी. महामंडळाच्या प्रवाशांसाठीच्या योजना लागू राहणार आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना मोफत प्रवास, महिलांसाठी महिला सन्मान योजनेअंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत यासह शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहाणार आहेत. या योजनांचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी जवळच्या आगार बसस्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
१९३ ई-बसेस १३४ सीसीटीव्ही
विभागात नव्या २५ जिजाऊ बसेसची सेवा सुरू झाली असून १९३ ई-बसेस येणार आहेत. परिसरात सुरक्षिततेसाठी १३४ अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आगार परिसर स्वच्छतेसाठी लोकांचा वावर (फूटप्रिंट) संख्येनुसार सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर ७८ हजार वृक्षांचे रोपण केले जाणार असून कोल्हापूर विभागात ३७०० वृक्षारोपण होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक वृषाली भोसले यांनी दिली.