कोल्हापूर : नुकतेच जगात आलेल्या त्या इवल्याशा जीवाला ना आईची माया मिळाली, ना वडिलांचे छत्र लाभले. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आई अस्मिता काटकर हिने जगाचा निरोप घेतला, तर वडील प्रतीक काटकर याच्यासह घरातील चारजण सध्या पोलिस कोठडीत आहेत. अशा परिस्थितीत महिन्याच्या तान्हुलीचे काय होणार, हा यक्षप्रश्न होता. मात्र, मंगळवारी बालकल्याण समितीसमोर झालेल्या एका संवेदनशील घडामोडीमुळे या चिमुरडीला अखेर पतीच्या नातेवाईकांचा हक्काचा आसरा मिळाला आहे.
अस्मिता मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी प्रतीक, वीरेंद्र, मनीषा आणि ऋतुजा या चौघांना मंगळवारी बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी समितीने बाळाच्या भविष्याबाबत आणि संगोपनाबाबत वडील प्रतीककडे विचारणा केली. त्यावेळी प्रतीकने, माझ्या मुलीची जबाबदारी माझे चुलते अभिजित आणि चुलती युगंधरा काटकर यांच्याकडे द्यावी, अशी विनंती केली. अभिजित काटकर यांनीही समितीकडे तसा रीतसर अर्ज सादर केला. या संवेदनशील प्रकरणात बालकल्याण समितीने अभिजित आणि युगंधरा काटकर हे दोघे बाळाचे संगोपन करण्यास आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत का, याची सखोल खात्री करून घेतली. त्यानंतरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आणि त्यांच्याकडून संगोपनाचे हमीपत्र लिहून घेत, बाळाचा ताबा तात्पुरत्या स्वरूपात दिला.
माहेरच्यांच्या भूमिकेने आश्चर्य
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत अस्मिताचे माहेरचे नातेवाईक मंगळवारी बालकल्याण समितीकडे फिरकलेच नाहीत. आपल्या पोटच्या लेकीच्या निधनानंतर तिच्या मागे राहिलेल्या एका महिन्याच्या बाळाची विचारपूस करण्यासाठीही माहेरचे कोणी न आल्याने उपस्थित पोलिस अधिकारी आणि समितीच्या सदस्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.