

सुनील कांबळे
नागाव: वानराने दुचाकी गाडीला लावलेली चावी काढून घेऊन धुम ठोकली. मोटारसायकल स्वारास चावी मिळविण्यासाठी बिस्कीट, फळे खायला देण्याचे आमिष दाखवून चावी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले, पण तरीही वानर चावी द्यायला काही केल्या तयार होईना. चावी मिळविण्यासाठी दुकाची मालकास तारेवरील कसरत करावी लागली ही घटना पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) फाट्यावर असलेल्या एलिट हाॅस्पिटल समोर घडली. या घटनेवरून जमलेल्या नागरिकांना लहानपणीची बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकातील धड्याची व त्या कथेची आठवण झाली.
शिरोली पुलाची गावात वानरांनी उच्छाद मांडला असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी असाच उच्छाद मांडणाऱ्या वानरांना वनविभागाच्या अधिकारी व नागरिकांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न करत पकडून वन अधिवासात सोडण्यात आले होते. त्याच कळपातील हे वानर त्यावेळी सापडले नव्हते. तेच वानर या हाॅस्पिटल परिसरात ठिय्या मांडून बसले आहे. रविवारी हाॅस्पिटल शेजारी असणाऱ्या माझा इलेक्ट्रिक व सुमो डिझेल पाॅवर सर्व्हिसेस ( बाॅस ) या कंपनीच्या दारात कंपनीचा कर्मचारी बाहेरून दुचाकी घेवून आला व गाडी स्टॅन्डवर लावली तोच वानराने दुचाकीकडे धाव घेवून दुचाकीची चावी काढून घेवून कंपनीच्या बोर्डवर जावून बसले.
कंपनीचे कर्मचारी चावी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असता ते झाडावरही गेले. त्याला बिस्कीट खाऊ टाकण्यात आले, फळे खाऊ घालण्यात आली पण ते वानर चावी काय द्यायचे नाव घेईना .. अनेक प्रयत्न केले प्रयोग केले हतबल झालेल्या दुचाकी मालकाने चावी मिळेल याची आशाच सोडली आणि डोक्यावर हात ठेवून बसला. त्या वानराला काय वाटले असेल कोणास ठाऊक डोकं धरून बसलेल्या दुचाकीस्वाराची दया आली असावी त्या वानराने चावी त्याच्या समोर टाकली. या घटनेवरून लहानपणी बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या पुस्तकात टोपीवाला व वानराची गोष्टीची आठवण ताजी झाली..