

मुंबई/ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मौजे टाकळी येथील एकूण ४७.६३ हेक्टर शासकीय व गायरान जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) औद्योगिक वापरासाठी देण्यास मंजुरी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावाला रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मौजे टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील गट क्रमांक १३५० मधील १२.८६ हेक्टर गायरान जमीन, १५.०० हेक्टर शासकीय जमीन तसेच गट क्रमांक ११९४ मधील १९.७७ हेक्टर गायरान जमीन अशी एकूण ४७.६३ हेक्टर जमीन आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात औद्योगिक विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. या निर्णयामुळे शिरोळ परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.