Gokul Election : 'महायुती' विरुद्ध शाहू शेतकरी समविचारी आघाडीत सामना

गोकुळ निवडणूक : महायुतीमध्ये महाडिक-मुश्रीफ-आबिटकरांची नवी मैत्री एका बाजूला, तर सतेज पाटील यांची पक्षविरहित आघाडीची मोट
Gokul election |
Gokul election |
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या गोकुळच्या सत्तेसाठी यावेळी थेट महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासारख्या दिग्गजांची फौज महायुतीत आहे, तर दुसऱ्या बाजूला गोकुळवरील सत्ता कायम राखण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी पक्षनिरपेक्ष समविचारी आघाडीची मोट बांधली आहे.

आगामी निवडणूक केवळ दूध संघाची राहिलेली नसून, ती जिल्ह्यातील राजकीय ताकदीची चाचणी ठरणार आहे. त्यामुळे गोकुळचे रणांगण राज्यातील प्रमुख राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू बनले आहे.

‌‘मनपा‌’च्या सत्तेपासून समविचारी आघाडीपर्यंतचा प्रवास

गोकुळवर अनेक वर्षे तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील ‌‘मनपा‌’ गटाचे निर्विवाद वर्चस्व होते; मात्र सहा वर्षांपूर्वी गोकुळला मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर या विषयावरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. आमदार सतेज पाटील यांनी या प्रस्तावाविरोधात जिल्हाभर जनमत तयार केले. त्यावेळी त्यांना मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि संजय मंडलिक यांची साथ मिळाली. या एकजुटीच्या जोरावर महाडिक गटाची सत्ता उलथवून टाकण्यात यश आले आणि गोकुळमध्ये नव्या नेतृत्वाची स्थापना झाली.

पाच वर्षांत बदललेले राजकीय समीकरण

गत निवडणुकीतील प्रमुख सहकारी असलेले नेते आज वेगवेगळ्या राजकीय छावण्यांत उभे आहेत. राष्ट्रवादी काँग््रेास महायुतीत सहभागी झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते महायुतीच्या व्यासपीठावर आले. परिणामी, एकेकाळी गोकुळमध्ये एकत्र लढणारे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ आता परस्परविरोधी राजकीय बाजूंवर उभे ठाकले आहेत. याच बदललेल्या परिस्थितीमुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची बनली आहे. गतवेळी सतेज पाटील यांच्यासोबत असलेले आबिटकर, नरके आणि मंडलिक यांच्यासह महाडिक गट एकाच व्यासपीठावर आल्याने महायुतीची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

‌‘शेतकरी हित‌’ हा सतेज पाटील यांचा प्रचाराचा केंद्रबिंदू

महायुतीच्या एकत्रित शक्तीला उत्तर देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी ‌‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी‌’ उभी केली आहे. गोकुळ ही राजकीय नव्हे, तर शेतकऱ्यांची संस्था असून तिच्याकडे पक्षीय चष्म्यातून पाहू नये, असा मुद्दा घेऊन ते सभासदांसमोर जात आहेत. समविचारी आघाडीच्या माध्यमातून पक्षीय सीमारेषा ओलांडून शेतकरी व सभासदांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीतील संभाव्य अंतर्गत मतभेदांचा लाभ घेऊन पुन्हा सत्ता राखण्याची रणनीती आखली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मतदार कोणाला कौल देणार?

महायुतीकडे संघटनात्मक ताकद, व्यापक राजकीय नेटवर्क आणि दिग्गज नेत्यांची फौज आहे. सतेज पाटील यांच्याकडे गेल्या पाच वर्षांतील कारभाराचा अनुभव, विद्यमान सत्तेचा लाभ आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यावर उभी केलेली भावनिक भूमिका आहे. अंतिम निकाल ठरवताना सभासद मतदार विकासाच्या दाव्यांना प्राधान्य देतात की शेतकरी स्वायत्ततेच्या मुद्द्याला, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. गोकुळच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत महायुतीची एकत्रित ताकद निर्णायक ठरणार की सतेज पाटील यांची शेतकरी केंद्रित रणनीती पुन्हा एकदा यशस्वी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news