

पन्हाळा : ऐन उन्हाळ्याच्या तीवतेत आणि पिकांना पाण्याची सर्वाधिक गरज असतानाच महावितरणने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कृषी वाहिन्यांवरील 3-फेज वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करून थेट 2 तासांची कपात करण्यात आली आहे. हा नवा निर्णय 26 मे ते 15 जून 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री सलग 8 तास वीज दिली जात होती, ती आता थेट 6 तासांवर आणली गेली आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी अत्यावश्यक असतानाच महावितरणने अचानक वीज कपात केल्यामुळे कोल्हापूर ग््राामीण व शहरातील शेतकरी वर्गातून तीव संताप व्यक्त होत आहे.
महावितरणने जाहीर केलेल्या तात्पुरत्या सुधारित वेळापत्रकानुसार, जिल्ह्यातील गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर ग््राामीण भाग 1 व 2 या सर्वच विभागांमधील विजेची वेळ आता 6 तासांची करण्यात आली आहे. हे नवे स्लॉट महावितरणच्या चक्राकार पद्धतीनुसार दिवसा आणि रात्रीच्या वेळेत आलटून-पालटून लागू केले जाणार आहेत.
सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी तळ गाठत आहे. अशा कडक उन्हात उभ्या पिकांना नियमित पाणी देणे गरजेचे असते. मात्र, अवघ्या 6 तासांच्या वीज पुरवठ्यामुळे पूर्ण शेताला पाणी देणे शेतकऱ्यांना अशक्य होणार आहे. त्यातच रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे दिलेल्या विजेच्या वेळेमुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री शेतात पाणी पाजावे लागणार आहे.
ऐन उन्हाळ्यात पिके जळण्याची भीती निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, महावितरणने हा जाचक निर्णय मागे घेऊन पूर्ववत आठ तास वीज द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.