

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणधारकांच्या याचिकांवर गुरुवारी (दि. २५) सर्किट बेंचमध्ये अंतिम सुनावणी आहे. तत्पूर्वी मंगळवारी (दि. २३) मंत्रालयात नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता यांनीही मिळकती नियमित करणेबाबत सुनावणी ठेवली आहे. दोन्ही सुनावणीत स्थगिती न मिळाल्यास बेकायदेशीर बांधकामांवर शुक्रवारपासून (दि. २६) पुन्हा धडक कारवाई केली जाणार आहे.
भाजपचे आ. अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. तावडे हॉटेल परिसरातील मिळकती नियमित कराव्यात, महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी त्या मिळकतीसंदर्भात दिलेल्या निकालाला स्थगिती द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. त्या अनुषंगाने उद्या दुपारी ३ वा. सुनावणी होणार असून आयुक्त व इतर अधिकारी ऑनलाईन सहभागी होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र आयुक्तांना सोमवारी (दि. २२) आले आहे.
तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी दिला आहे. संबंधित बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्या नोटिसांना आव्हान दिले होते. ७ मे रोजी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू करून १ जून रोजी अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसांवर १७७ मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील अंतिम सुनावणी २५ जून रोजी होणार असून तोपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र उर्वरीत मिळकतींबाबत आदेश नाहीत. त्या मिळकतींवर सोमवारी (दि. २२) कारवाई करण्यात आली.