

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा झाला आहे. माळरानावरील पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेक तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत खरिपाच्या पेरणीत अवघी तीन टक्क्यांची भर पडली असून जिल्ह्यातील एकूण पेरणी ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
अल निनोमुळे हवामान विभागाने पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले होते. त्यात पाणी उपसा यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई केली नाही. आता जोरदार पाऊस झाला असून पेरणीसाठी शिवारात वापसा मिळालेला नाही. उशिरा पाऊस, महागड्या दराने बियाणे खरेदी आणि आता पेरणीसाठी वापसा नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मका ८५ टक्के, तीळ ७५ टक्के आणि ६१ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. प्रत्येक वर्षी सर्वाधिक भात पिकाची पेरणी होते. पण यंदा ही पेरणी अवघी ४० टक्के झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात भाताची पेरणी ७५ टक्के झाली होती.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला असला तरी अनेक भागांत अद्याप पुरेशा प्रमाणात पेरणी झालेली नाही. जोरदार कोसळलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीला अडथळा येत आहे. आणखी काही दिवस पावसाने उसंत दिली आणि जमिनीमध्ये वापसा आला तर पुन्हा पेरणीसाठी शिवारामध्ये धांदल होईल.
तृणधान्यांची ३६ टक्के पेरणी
जिल्ह्यात तृणधान्यांची ४७६९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ही टक्केवारी ३६ टक्के इतकी आहे. कडधान्यांची एकूण पेरणी क्षेत्र ४८६.२ हेक्टर आहे. त्यांची टक्केवारी १५ टक्के तर अन्नधान्ये पेरणी ४८१४९ हेक्टर आहे. त्याची टक्केवारी ३५ टक्के आहे. तेलबिया पेरणीचे क्षेत्र ४४ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यांची टक्केवारी ५६ आहे.