

दिलीप भिसे
कोल्हापूर : राजकीय आश्रय आणि मुबलक कमाईला सोकावलेल्या सराईत टोळ्यांनी टिच्चून गर्भलिंग निदान, गर्भपाताची खुलेआम दुकानदारी सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात सहा वर्षांत ३८ अड्ड्यांचा पर्दाफाश होऊनही ग्रामीण भागात पेव फुटले आहे. काळजावर घाव घालणारे अड्डे प्रशासन रोखणार आहे की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.
६६ महिन्यांत ३८ अड्ड्यांचा पर्दाफाश
पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या सेंटरचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. २०२० पासून जून २०२६ अखेर ६६ महिन्यांत जिल्ह्यातील ३८ अड्ड्यांचा पर्दाफाश झाला आहे. २५० पेक्षा अधिक बोगस डॉक्टरसह सराईतांना जेलचा रस्ता दाखविण्यात आला. तरीही सराईत टोळ्यांचे कारनामे सुरूच आहेत. पोलिसांच्या जुजबी कारवाईमुळे टोळ्यांचे उद्योग वाढतच आहे.
गोळ्यासाठी चिठ्ठी देणाऱ्या डॉक्टर, कंपनीवरील कारवाई गुलदस्त्यात?
एप्रिल २०२६ मध्ये बिद्री येथील हॉस्पिटलवर छापा टाकून गर्भलिंग निदान, गर्भपात सेंटरचा भांडाफोड झाला. १३ संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. एका मेडिकल चालकाने गोळ्यांची विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. चालकाच्या जबाबात देसाई नामक डॉक्टरच्या चिठ्ठीनुसार गोळ्यांची विक्री झाल्याचे उघड झाले. गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या दिल्लीतील कंपनीचे नाव पुढे आले. संशयितांवर दोषारोप होऊनही अजून चिठ्ठी देणाऱ्या डॉक्टर, औषध निर्मिती कंपनीविरुद्ध कोणती पावले उचलण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे.