Kolhapur Rain update : नद्यांच्या पाणीपातळीत वाढ सुरूच

अनेक बंधाऱ्यांवर पाणी; पर्यायी मार्गाने वाहतूक : घरांची पडझड
Kolhapur Rain update
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ सुरूच
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप होती. सोमवारी पहाटे दमदार पाऊस झाला. यामुळे अनेक नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही गावात घरांची पडझड झाली आहे.

करवीर : तालुक्यातील ऊस भुईसपाट

शिरोली दुमाला : करवीर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह आलेल्या जोरदार वाऱ्याने करवीर तालुक्यात उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. वाढीच्या आणि जोमदार अवस्थेत असलेला हजारो एकरांवरील ऊस अक्षरशः भुईसपाट झाला असून शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे.

कागल : बंधारे पाण्याखाली, अनेक मार्ग बंद

कागल : कागल तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक बंधारे तसेच ओढे, नाल्यावर पाणी आल्यामुळे रहदारी बंद झाली असून पर्यायी मार्गांचा अवलंब केला जात आहे. बेलवळे खुर्द येथील कृष्णा दत्तात्रय पाटील यांचे घर पडले आहे. हसूर खुर्द येथील मुक्ताबाई नेमा कांबळे, कासारी येथील निसार बुवा देसाई यांचे राहते घर कोसळलेले आहे. खडकेवाडा येथील कमलाबाई पुंडे (सोनगे) येथील रत्नाकर शामराव तिराळे आणि एकोंडी येथील मोहन शिवाजी उत्तुरे यांच्या घराचे तसेच कंपाऊंडचे पावसाने नुकसान झाले आहे.

आजरा : साळगाव बंधारा पाण्याखाली

आजरा : आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे घरांची, काजू शेड, शेतीची पडझड झाली आहे. यामध्ये सुमारे ६८ हजारांचे नुकसान झाले आहे. धनगरवाडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. हिरण्यकेशी व चित्री नदी दुतर्फा तुडुंब वाहत आहेत. सर्फनाला प्रकल्पात ६२.६५ टक्के पाणीसाठा झाला. लाटगाव येथील अनिल दौलतराव सरदेसाई यांच्या काजू शेडवर झाडाची फांदी पडून २० हजाराचे नुकसान झाले. मुरुडे येथे अंगणवाडी शाळेचे शेड पत्रे पडून ४० हजाराचे नुकसान झाले.

हातकणंगले : शेतीकामाला वेग

हातकणंगले : हातकणंगले तालुक्यात पाच दिवसांपासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र शेतीकामाला वेग आला आहे. दुसरीकडे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातून जाणार्‍या पंचगंगा व वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे लगतच्या शेतामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. सततच्या पावसाने विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

गडहिंग्लज : दोन बंधारे पाण्याखाली

गडहिंग्लज : तालुक्यात दोन दिवस संततधार झालेल्या पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली असली तरी कोकणपट्ट्यात झालेल्या जोरदार पावसाने निलजी व ऐनापूर हे दोन्ही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज मुख्यालयात ५२ मि.मी. पाऊस झाला असून तालुक्यात सात घरांची पडझड झाली आहे. यामध्ये दुंडगे येथे संजय दावणे यांच्या घराचे छप्पर व भिंत पडून ५० हजारांचे तर चेतना कांबळे यांची भिंत पडून २५ हजारांचे नुकसान झाले. चिंचेवाडी येथील रत्नाबाई घेवडे यांच्या गोठ्याची भिंत पडून २० हजारांचे तर कडलगे येथील बाळासाहेब देवकांबळे यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले.

चंदगड : दोन घरांची पडझड

चंदगड : चंदगड तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, सोमवारी सकाळी ताम्रपर्णी नदीवरील चंदगडजवळील आसगाव बंधारा, वेंगुर्ला मार्गाला लागून असलेला कोनेवाडी बंधारा तर घटप्रभा नदीवरील बिजूर-भोगोली, पिळणी, हिंडगाव, कानडी-सावर्डे, अडकूर-गणुचीवाडी असे सात बंधारे सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याखाली गेले. पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी बंधार्‍यांना भेटी देऊन प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

राधानगरी : संततधार सुरूच

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण ४६ टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात २०२ मिमी इतका पाऊस झाला.तर दिवसभरात ७५ मिमी पाऊस झाला. काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण १८ टक्के भरले असून ४.५४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

शिरोळ : ७ बंधारे पाण्याखाली

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात पाऊस तुरळक असला तरी घाटमाथा, पाणलोट व धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वारणा नदीवरील कोथळी बंधारा वगळता ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या राजापूर बंधाऱ्यातून ६५,५०० क्युसेक पाणी कर्नाटकात विसर्ग केले जात आहे. अलमट्टी धरणात २०.७२५ टीएमसी पाणी साठा उपलब्ध झाला आहे.

शाहूवाडी : पिके पाण्याखाली

​बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील प्रमुख नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, कानसा, कडवी आणि वारणा नदी खोऱ्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वारणा आणि कडवी नदीकाठची शेकडो एकर शेती आणि पिके पाण्याखाली गेली आहेत.

पन्हाळा : अनेक घरांची पडझड

पन्हाळा : तालुक्यात मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात घरांची आणि गोठ्यांची मोठी पडझड झाली आहे. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेला आहे. अनेक कुटुंबांची राहती घरे अंशतः किंवा पूर्णतः बाधित झाली असून प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गगनबावडा : कुंभी नदीला पूर

गगनबावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून गगनबावडा तालुक्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी काहीसा ओसरला आहे. तालुक्यात सरासरी आतापर्यंत ५४२ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news