

पुणे /कोल्हापूर : महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांची ज्या मान्सूनच्या जलधारांकडे आस लागली होती, तो मान्सून अखेर सोमवारी जोरदार बरसला. त्याने गोव्यापासून जलधारांची बरसात केली. तो रत्नागिरीत दिवसभर धो-धो कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला चिंब करीत कोल्हापूरमध्ये बरसला आणि त्याने पुण्याकडे कूच केली. अल निनोचे अडथळे पार करत अखेर सोमवारी सकाळी मान्सून पुणे शहरात दाखल झाला.
मान्सूनने आता वेग धरला असून आनंदघनांच्या बरसातीने वातावरणात गारवा निर्माण झाला. मान्सूनच्या आगमानाने बळीराजा सुखावला आहे. यंदा तो तब्बल १५ दिवस उशिरा आला. मान्सूनचा वेग पाहता आगामी ४८ तासांत तो मुंबईत पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले पंधरा दिवस मान्सून बारामती, हरणाई, सोलापूर भागात थबकलेला होता.
अशी आहे स्थिती
मान्सूनची रेषा पुणे, अलिबाग, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, निजामाबाद, दंतेवाडा, बालंगीर, सुंदरगड, चतरा, गया, मुझफ्फर, बिहार, ओडिशा या भागातून जात आहे.
आगामी ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापणार आहे.