Gokul Election : भुदरगडमधील सर्वाधिक १०१ दूध संस्‍था अपात्र

गडहिंग्‍लज, शाहूवाडी, करवीर, पन्‍हाळा तालुक्‍यालाही फटका
Gokul Election |
भुदरगडमधील सर्वाधिक १०१ दूध संस्‍था अपात्र
Published on
Updated on

कोल्‍हापूर : अवसायन प्रक्रियेत भुदरगड तालुक्‍यातील सर्वाधिक १०१ दूध संस्‍था अपात्र ठरल्‍या आहेत. त्‍यापाठोपाठ गडहिंग्‍लज, शाहूवाडी, करवीर आणि पन्‍हाळा तालुक्‍यातील दूध संस्‍थांनाही फटका बसला आहे. अपात्र ठरलेल्‍या ४४१ दूध संस्‍था गोकुळ निवडणुकीसाठी अपात्र ठरल्‍या आहेत. प्रलंबित राहिलेल्‍या २३५ संस्‍थांपैकी सुमारे २०० संस्‍था अपात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. यामध्‍ये कोणत्‍या तालुक्‍यातील सर्वाधिक संस्‍था असणार यासह १३२० पैकी किती संस्‍था पात्र, अपात्र ठरणार याचे चित्र बुधवारी स्‍पष्‍ट होणार आहे.

आकडेवारीचे काम मंगळवारी पहाटेपर्यंत

सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्‍याने संस्‍था पात्र, अपात्रतेची आकडेवारी निश्‍चित करण्‍याचे काम सहायक निबंधक कार्यालयात युद्धपातळीवर सुरू होती. सोमवारी सुरू झालेले काम मंगळवारी (दि.१६) पहाटेपर्यंत सुरू होते, तरीही २३५ संस्‍थांचे आदेश निर्गमित करणे प्रलंबित राहिले आहे.

‘त्‍या’ २६७ संस्‍था तूर्तास पात्र

तत्‍कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निकाल दिलेल्‍या २६७ दूध संस्‍थांबाबतची सुनावणी मुंबईत सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्‍यासमोर सुरू आहे; मात्र तूर्तास या संस्‍था पात्र ठरल्‍या असल्‍याने त्‍यांना ठरावाचा मसुदा पाठविला आहे. सुनावणीमध्‍ये पात्र ठरणार्‍या संस्‍थांचे ठराव ग्राह्य धरले जाणार आहेत.

अपात्र संस्थांची संख्या ६५० होणार?

प्रलंबित असलेल्‍या २३५ दूध संस्‍थांपैकी केवळ ३० ते ३५ संस्‍थांच पात्र ठरण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे अपात्र संस्‍थांची संख्‍या आणखी २०० ने वाढण्‍याची शक्‍यात आहे. त्‍यानुसार अपात्र दूध संस्‍थांची संख्‍या सुमारे ६५० होण्‍याची शक्‍यता आहे.

दिवसभरात २२ ठराव दाखल

दिवसभरात २२ दूध संस्‍थांनी ठराव दाखल केले. राधानगरी, करवीर प्रत्‍येकी ४, गडहिंग्‍लज ७, चंदगड ३ तर शिरोळ, भुदरगड, आजरा व पन्‍हाळा तालुक्‍यातून प्रत्‍येकी एक ठराव प्राप्‍त झाला. आजअखेर एकूण १०६ दूध संस्‍थांचे ठराव सहायक निबंधक (दुग्‍ध) कार्यालयात दाखल झाले आहेत.

दूध संस्‍था प्रतिनिधी आज विभागीय उपनिबंधकांना भेटणार

तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळची बदनामी केल्‍याने त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी दूध संस्था प्रतिनिधींनी गोकुळ प्रशासनाकडे केली आहे; मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न केल्‍याने दूध संस्‍था प्रतिनिधी बुधवारी पुण्‍यात विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते प्रकाश बेलवाडे यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍याची मागणी करणार असल्‍याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news