

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणूक २०२६-२०३१ साठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून २२ जून २०२६ पर्यंत जिल्ह्यातील १२ तालुक्यांतून एकूण २४२ ठराव प्राप्त झाले आहेत. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातून सर्वाधिक ७९ ठराव दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातून ४७ ठराव आले आहेत. सोमवारी एका दिवसात एकूण ८९ ठराव दाखल झाले. गडहिंग्लज तालुक्यातून सर्वाधिक ४३ ठराव दाखल झाले.
गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय गटांकडून शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. मतदारांशी संपर्क, ठराव गोळा करण्याची मोहीम आणि उमेदवारीसाठी आवश्यक गणिते जुळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राप्त झालेल्या ठरावांवरून तालुकानिहाय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. तालुकानिहाय प्राप्त ठरावांमध्ये आजरा तालुक्यात ४१, भुदरगड १२, चंदगड १३, गडहिंग्लज ७९, गगनबावडा ४, हातकणंगले १३, कागल ३, करवीर ४७, पन्हाळा ६, राधानगरी ८, शाहूवाडी ६ आणि शिरोळ १० ठराव दाखल झाले आहेत.
गडहिंग्लज आणि करवीर तालुक्यांतील ठरावांची संख्या लक्षणीय असल्याने या दोन्ही भागांकडे विशेष लक्ष लागले आहे. तर काही तालुक्यांत ठरावांची संख्या तुलनेने कमी असून पुढील टप्प्यात येथेही हालचाली वाढण्याची शक्यता आहे. गोकुळच्या निवडणुकीत ठरावांची संख्या ही राजकीय ताकद दाखविण्याचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे येत्या दिवसांत विविध पॅनेल आणि गटांकडून आणखी ठराव दाखल करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
शेवटचा आठवडा निर्णायक ठरणार
गोकुळसाठी ठराव दाखल करण्याची मुदत आठवडाभरात संपणार आहे. त्यामुळे आता गोकुळ ठराव दाखल व्हायला सुरुवात झाली असली तरीदेखील २५ जूननंतर त्यामध्ये मोठी चुरस आणि ईर्ष्या दिसून येणार आहे. २५ जूनला महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शक्तिप्रदर्शनाने ठराव दाखल केले जाणार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून २९ जूनला आणि काँग्रेस आणि मित्र पक्षाकडून ३० जूनला शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले जाणार आहे.