

कोल्हापूर ःमेंदूच्या आतमध्ये असलेली अन्युरिझम (रक्तवाहिनी) फुटून गंभीर झालेल्या 55 वर्षीय महिलेवर सीपीआर येथील न्युरोसर्जन विभागाने तब्बल सहा तास शस्त्रक्रिया केली. त्यामुळे संबंधित महिला धोक्यातून बाहेर आली असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. निशांत गोब्बूर, डॉ. अनिल जाधव, डॉ. तृप्ती पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. गोब्बूर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील महिला डोकेदुखी, चक्कर येत असल्यामुळे बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल झाली होती. तिच्या मेंदूचा एमआरआय केल्यानंतर मेंदूमधील रक्तवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले. मेंदूत रक्तवाहिनी फुटल्यानंतर 35 टक्के रुग्ण दगावतात. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. एचडी मायक्रोस्कोप, मायक्रो सर्जिकल इन्स्टुमेटच्या साहाय्याने 6 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवस ट्रामा आयसीयूमध्ये निगराणीसाठी ठेवण्यात आले होते. आता महिलेची प्रकृती पूर्णतः बरी झाली आहे. सीपीआरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुर्मीळ शस्त्रक्रिया अत्याधुनिक उपकरणाद्वारे झाली आहे. यासाठी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, सर्जरी विभागप्रमुख वसंतराव देशमुख, डॉ. ऋषीकेश बंडगर, डॉ. नेहा रहांगदळे, भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. धनंजय मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले.