Ambabai Temple Corridor| शंभर वर्षे सेवा होईल असा अंबाबाई मंदिराचा विकास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मंदिर सुशोभीकरणाने दक्षिण काशीला जागतिक ओळख मिळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ambabai Temple Corridor
Ambabai Temple Corridor
Published on
Updated on

कोल्‍हापूर : पुढील शंभर वर्षे भाविकांची सेवा होईल, असा विकास अंबाबाई मंदिराचा केला जाईल, अशी ग्‍वाही मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पोलिस परेड ग्राऊंडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभेत ते बोलत होते. अंबाबाई मंदिर सुशोभीकरणाने दक्षिण काशीला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्‍यमंत्री फडणवीस म्हणाले, अंबाबाई मंदिराच्या जीर्णोद्धार व परिसर विकासाची सर्वांची इच्छा होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही मनापासून इच्छा होती. ते वारंवार सांगत असत की, कोल्हापुरात शक्तिपीठ आहे. एवढे ऐतिहासिक मंदिर असून देशभरातून लाखो भाविक येथे येतात, मात्र इतक्या वर्षांत परिसराचा विकास झाला नाही. त्यासाठी भारत सरकार मदत करेल, महाराष्ट्र सरकारने हे काम हाती घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता. तिरूपतीच्या दर्शनानंतर अंबाबाईच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा आहे. भाविकांची पुढील शंभर वर्षे सेवा करता यावी, या उद्देशाने हे कार्य हाती घेण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकास भी, विरासत भी’ हा मंत्र दिला आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. श्री अंबाबाईने छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आशीर्वाद दिला आहे. छत्रपती शिवरायांनीही अंबाबाईचे दर्शन घेतले होते. संपूर्ण भारतात मंदिरांचा विनाश होत असताना पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांनी मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्‍याचे काम केले. तीच परंपरा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सुरू केली आहे. आपण आपल्या संस्कृती आणि परंपरांकडे पुन्हा एकदा वळत आहोत.

पंढरपूर कॉरिडॉरचा विकास केला जात आहे. जोतिबा मंदिर परिसरासह पाच ज्योतिर्लिंग मंदिरांच्या विकासाची कामे सुरू आहेत, असे सांगत फडणवीस म्हणाले, कोल्हापूरला ‘अध्यात्माची पंढरी’ आणि सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. देशात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून अमित शहा यांच्याकडे त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. सहकार क्षेत्राला नवे स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. सहकारी संस्था अधिक सक्षम केल्या जात आहेत.

दक्षिण काशीला जागतिक ओळख मिळेल : उपमुख्यमंत्री शिंदे

अंबाबाई मंदिर परिसराच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ होत असून, हा दिवस सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, असा विश्‍वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाद शिंदे म्हणाले, ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरच्या ‘दक्षिण काशी’ या ओळखीला जागतिक स्तरावर नवी उंची मिळेल. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहील, असे अनेकांना वाटत नव्हते; मात्र ते स्वप्न साकार झाले. देशभरातील तीर्थक्षेत्रांचा विकास होत असून अंबाबाई मंदिराच्या सुशोभीकरणामुळे भाविकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल. कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘प्रसाद’ योजनेत समावेश करा : पालकमंत्री आबिटकर

अंबाबाई मंदिराचा केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेत समावेश करून तिरूपती आणि अयोध्येच्या धर्तीवर भव्य विकास करावा, अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. ते म्हणाले, अंबाबाई मंदिराच्या विकासाचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात होते. दररोज हजारो भाविक अंबाबाई दर्शनाला येतात. सण-उत्सवांत ही संख्‍या लाखांत जाते. त्यामुळे पार्किंग, रस्ते, स्वच्छता, निवास व्यवस्था, वाहतूक आणि अन्य मूलभूत सुविधांचा विस्तार करणे आवश्‍यक आहे.

खासदार धनंजय महाडिक प्रास्ताविकात म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व दहा जागा महायुती जिंकेल, असा शहा यांना दिलेला शब्द कोल्हापूरकरांनी पाळला आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, वाराणसीच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करा.

कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष रवींद्र चव्‍हाण, उच्‍च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, सांस्‍कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कोल्‍हापूरच्‍या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शिल्‍पा खोत, खा. धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे समित कदम, राष्‍ट्रवादीचे बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, आदिल फरास, भाजपचे विजय जाधव, महेश जाधव, नाथाजी पाटील, शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख सुजित चव्‍हाण यांच्‍यासह महायुतीच्‍या घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news