Kolhapur News : जिल्हा शल्यचिकिस्तक कार्यालयाला पुन्हा कुलुप

वैद्यकीय अधीक्षकांचा फलक लावल्याने सीपीआरमधील वाद दुसऱ्या दिवशीही सुरूच
CPR Hospital
कोल्हापूर : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाला मंगळवारी पुन्हा कुलूप लावण्यात आले.
Published on
Updated on

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या ताब्यावरून सुरू असणारा वाद दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. मंगळवारी पहाटे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सर्व साहित्य काढून कार्यालयाला कुलूप लावले. कार्यालयाबाहेर वैद्यकीय अधीक्षकांचा फलक लावल्याने दोन दिवसांपासून सुरू असलेला वाद आणखी उफाळला.

याबाबत शल्यचिकित्सकांनी केबिनचा ताबा सोडावा, अशी मागणी केल्याचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी सांगितले, तर साहित्य बाहेर काढून कार्यालयाला कुलूप लावल्याप्रकरणाबाबत वरिष्ठांना कळविले असून त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी सांगितले.

शल्यचिकित्सकांच्या कार्यालयावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. नूतनीकरणाच्या कामावेळीही कार्यालयाचा ताबा सोडण्यावरून अधिष्ठाता व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यात वाद झाला होता. जिल्हा शल्यचिकित्सक ताबा न सोडण्यावर ठाम होते, तर अधिष्ठातांनी कार्यालय रिकामे करावे, अशा सूचना केल्या होत्या.

नूतनीकरणानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी संबंधित कार्यालयात कामकाज सुरू केले होते; मात्र मंगळवारी पहाटे या कार्यालयातील साहित्य काढून कक्षाला पुन्हा कुलूप लावले. कुलपाला साखळीही लावण्यात आली. दरवाजापुढे बॅरिकेडिंग लावून बंदोबस्तही ठेवण्यात आला. सकाळी ही बाब निदर्शनास येताच वातावरण चांगलेच तापले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी बंद असलेल्या कार्यालयाबाहेरच काही काळ आपले कामकाज केले. मोकळ्या जागेतच प्रमाणपत्रांचे वाटप केले.

तोडगा काढा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

या घटनेनंतर सी.पी.आर. बचाव कृती समितीने बैठक घेत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या कृतीचा निषेध केला. दररोज शेकडो रुग्ण जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे येतात. त्यांनी यापुढे कुठे जायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सी.पी.आर हॉस्पिटल व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालये तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रम विभाग हे पूर्वीप्रमाणे कार्यरत राहतील, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठा लढा उभा करावा लागेल. याबाबत निर्णय घेतला नाही, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बैठकीला वसंतराव मुळीक, डॉ. महेंद्र फाळके, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. बाबासाहेब थोरात, हशमत हवेरी, संजय क्षीरसागर, बाळासाहेब कवाळे, चंद्रकांत मोरे, तारकस सुरेश, बाळासाहेब बेलेकर आदी उपस्थित होते.

शासन निर्णायानुसार सर्व संपत्तीसह सीपीआर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी कार्यालय सोडून अन्य ठिकाणी बसावे.
- डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, राजर्षी छ. शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news