

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते व वाहने मोठ्या संख्येने येण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
हा आदेश २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नियुक्त मतदान केंद्रे व त्यांच्या परिसरात लागू राहील. या आदेशानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बूथ स्थापन करणे, प्रचार साहित्य बाळगणे किंवा त्याचा वापर करणे तसेच शासकीय कामकाजासाठी नियुक्त वाहने वगळता इतर वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट आदी साधने बाळगणे किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी संबंधित कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे. मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी किंवा इतर प्रतिनिधींनाही मोबाईलचा वापर, छायाचित्रण, चित्रीकरण अथवा मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही.
याशिवाय मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात शस्त्र अधिनियम, १९५९ मध्ये नमूद केलेली कोणतीही शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात केले आहे.