कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाले आहे. आता लवकरच खंडपीठही सुरू होईल, असा विश्वास दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे डॉ. जाधव यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेवेळी हा विश्वास व्यक्त केला.
डॉ. जाधव म्हणाले, सर्किट बेंच होण्यासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यामुळेच एवढ्या वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे खंडपीठही लवकरच मंजूर होईल. त्यामुळे सरन्यायाधीश गवई यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार करूया.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध केली आहे. इमारतीचे डिझाईन बनविण्याचे काम सुरू आहे. डिझाईन तयार होताच राज्य सरकार निधीची तरतूद करणार आहे. मात्र, कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेशी इमारत तयार करून घेतली पाहिजे, अशी सूचना डॉ. जाधव यांनी केली.
यावेळी उपस्थित वकिलांनी या सर्व कामात दै. ‘पुढारी’ व डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच, पुढील सर्व कामे आपल्या पुढाकाराशिवाय होणार नाहीत. त्यामुळे खंडपीठ होईपर्यंत आपल्या सहकार्याची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले.
खंडपीठाबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका सकारात्मक आहे. त्यामुळे नोटिफिकेशन येताच या कामास गती येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर गवई यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार करण्याचे नियोजन करू, असे डॉ. जाधव म्हणाले.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महादेवराव आडगुळे, उपाध्यक्ष ॲड. टी. एस. पाडेकर, ॲड. अजित मोहिते, ॲड. धनंजय पठाडे, ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. संपतराव पवार-पाटील, ॲड. प्रमोद दाभाडे, ॲड. सूरज भोसले, ॲड. वैष्णवी पाटील, ॲड. स्नेहल गुरव, ॲड. मनीषा सातपुते, ॲड. निखिल मुदगल, ॲड. स्वप्निल कराळे, ॲड. प्रीतम पातले उपस्थित होते.