

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापुरातील धन्यवाद सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे आदी घोषणा देणाऱ्या २५ हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभेतून बाहेर काढत ताब्यात घेतले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करावा आणि शहा यांची भेट घडवून आणावी, या मागणीसाठी समितीचे कार्यकर्ते ८ दिवसांपासून प्रयत्न करत होते. यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांच्याशी चर्चा करून वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. शनिवारी सकाळी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शहा यांची भेट घडवून आणण्याची मागणी केली. शिंदे यांनी याबाबत होकार दिला; मात्र भेटीची वेळ मिळाली नसल्याने कार्यकर्ते सभास्थळी गेले. शहा भाषणासाठी उभे राहताच घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाह यांनी भाषण सुरूच ठेवले. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांना सोडण्यात आले नव्हते. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सचिन केळवेकर, विकास कलघटकी, नारायण सांगावकर, अनिल पाटील, सूरज चव्हाण, साईराज जाधव, शांताराम होसुरकर, श्रीपाद काकतिकर यांचा समावेश आहे. आंदोलनात मालोजीराव अष्टेकर, आर. एम. चौगुले, मदन बामणे, शिवराज पाटील, गणेश दड्डीकर, उमेश पाटील, सुहास हुद्दार, श्रीकांत कदम आदींचा समावेश होता.