Ambabai Temple Development|अंबाबाई मंदिर कॉरिडॉर ६ महिन्यांत विकसित करणार

गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही; १५०० कोटींच्या मंदिर विकास आराखड्याचा शहा यांच्या हस्ते शुभारंभ
Ambabai Temple Development
Ambabai Temple Development
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यासाठी १५०० कोटींचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सर्व सुविधा उभारून हा अंबाबाई मंदिर कॉरिडॉर आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून सहा महिन्यांत विकसित करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिली. त्यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

मंदिर परिसरातील रामाचा पार येथे श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

अंबाबाई देवीचा येथे शेकडो वर्षांपासून वास आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा विकास हा केवळ कोल्हापूरसाठी नव्हे तर देशभरातील भक्तांसाठी आनंदाची बाब आहे, असे सांगत गृहमंत्री शहा म्हणाले, अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासामुळे भक्तीचा महापूर येईल. कॉरिडॉर अंतर्गत अंबाबाई मंदिर परिसरात २८ हजार ५८ चौरस मीटर क्षेत्रात सुविधा निर्माण केल्या जातील. सातव्या शतकात आकारास आलेल्या या मंदिराला नव्या ऊर्जेने उजाळा मिळेल. इतिहास आणि संस्कृती जपण्यासाठी १५०० कोटी ही मोठी बाब नसल्याचे सांगून गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. केंद्र आणि राज्य शासन धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध असून हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी शहा यांच्या पत्नी सौ. सोनल शहा, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी उपस्थित होते.

४१ मंदिरांचे संवर्धन होणार

मंदिर पुनर्निर्माण अंतर्गत पुरातत्त्व विभागाशी चर्चा करून येथील ४१ मंदिरांचे संवर्धन केले जाणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरात एआय सर्च कॅमेऱ्यावर आधारित सुरक्षा व्यवस्था, एलईडी प्रकाश योजना, आऊटडोअर गॅलरी, हेरिटेज वॉल, लाईट अँड साऊंड शो यासह अन्य सुविधा उभारून संपूर्ण परिसर आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून सहा महिन्यांत विकसित केला जाणार आहे. अंबाबाईच्या लाखो भक्तांना भक्तीची आणि जागरणची पुनर्प्रेरणा त्यातून मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news