Kolhapur News : जिल्‍ह्यातील २ लाख शेतकर्‍यांना ९४४ कोटी प्रोत्‍साहन अनुदान

पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची मागविली माहिती
Farmer Subsidy
Farmer Subsidy
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची शासनाने माहिती मागविली आहे. जिल्‍ह्यात सरासरी २ लाख शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात. त्‍यानुसार जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना साधारणत: ९४४ कोटी रुपये प्रोत्‍साहन अनुदानाची रक्‍कम मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. प्रोत्‍साहन अनुदानासाठी शासनाच्‍या निकषांमध्‍ये पात्र ठरणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्‍साहन अनुदान मिळणार आहे.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पीक कर्ज थकविणार्‍यांपैकी पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची संख्‍या सर्वाधिक आहे. जिल्‍ह्यात कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या माध्‍यमातून सुमारे २ लाख ६० हजार शेतकर्‍यांना प्रतिवर्षी पीक कर्जाचे वितरण केले जाते. यापैकी प्रतिवर्षी सरासरी ९० टक्‍क्‍यांपर्यंत पीक कर्जाची वसुली होती. त्‍यामुळे कर्जमाफीपेक्षा प्रोत्‍साहनपर अनुदान घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्‍या जिल्‍ह्यात सर्वाधिक आहे.

जिल्‍हा बँकेची यंदा ८६.२२ टक्‍के वसुली

कोल्‍हापूर जिल्‍हा बँकेने २०२५-२६ या पीक हंगामात २.६० लाख शेतकर्‍यांना २,५९५ कोटी रुपये पीक कर्जाचे वितरण केले होते. यापैकी ३० जून २०२६ अखेर २२३७ कोटी रुपये पीक कर्जाची वसुली केली आहे. कर्ज वितरणच्‍या तुलनेत वसुलीचे प्रमाण ८६.२२ टक्‍के इतके आहे.

प्रोत्‍साहन अनुदानाचे निकष पुढीलप्रमाणे

शेतकर्‍यांनी २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षापैकी कोणत्‍याही दोन वर्षांमध्‍ये पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपण्‍यापूर्वी अथवा ३० जून किंवा बँकेच्‍या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत कर्जाची परतफेड केलेली असावी. ज्‍या शेतकर्‍यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अल्‍पमुदत पीक कर्ज घेतले असल्‍यास अशा कर्जाची ३० सप्‍टेंबर २०२६ अखेर परतफेड करणे बंधनकारक आहे.

जिल्‍ह्यात १६७ कोटी रुपये कर्जमाफी

पुण्‍यश्‍लोक आहिल्‍यादेवी होळकर कर्जमुक्‍ती योजनेंतर्गत जिल्‍ह्यातील २६ हजार २४७ शेतकर्‍यांना आतापर्यंत १६७.२९ कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे. आता प्रोत्‍साहन अनुदानाची माहिती मागविल्‍याने नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्‍या नजरा आता अनुदानाकडे लागल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news