‘शौर्या’चे संगोपन बालसंकुलात; रमली कर्नाटकातील कुटुंबात!

कसबा बावड्यातील कचरा कोंडाळ्यात गेल्यावर्षी फेकलेल्या ‘त्या’ अर्भकाला मिळाली मायेची ऊब
kolhapur News
प्रातिनिधी छायाचित्रFile Photo
Published on
Updated on
एकनाथ नाईक

कोल्हापूर : हुडहुडी भरवणारी थंडी... पहाटेचा गारठा... कचर्‍याचा ढीग व राख, वाळलेल्या मिरच्यांमध्ये गुंडाळून फेकलेले... अंगाला झालेल्या जखमांमुळे रडणारे अर्भक कसबा बावडा परिसरात आढळले. या घटनेला डिसेंबर 2024 मध्ये वर्ष झाले. वैद्यकीय उपचारानंतर ‘त्या’ अर्भकाला बालसंकुलच्या शिशुगृहात मायेची ऊब मिळाली. त्यांना ‘नकोशी’ असणारी ‘शौर्या’ आता संकुलानंतर कर्नाटकातील एका कुटुंबात गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच रमलीय. शांत, गोंडस असणार्‍या शौर्याने बाल संकुलमधील सर्वांना लळा लावला होता.

कसबा बावडा येथे साफसफाई करताना कोंडाळ्यात महापालिकेच्या कर्मचार्‍यांना 31 डिसेंबर 2023 रोजी अर्भक सापडले. अंगाला झालेल्या जखमा आणि हृदय पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश... अशा परिस्थितीत ‘त्या’ अर्भकाला सीपीआरच्या बालरोग विभागात उपचारांसाठी दाखल केले. सहा दिवस येथे तिच्यावर बालरोगतज्ज्ञांनी उपचार केले. प्रकृती बरी झाल्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी त्यांनी तिला बालसंकुलच्या शिशुगृहाच्या कुशीत दिले. त्याच दिवशी बालसंकुलने तिचे नाव ‘शौर्या’ असे ठेवले.

पहिल्या दिवसापासून शौर्या बालसंकुलातील सर्वांची लाडकी झाली. संकुलातील ते शेंडेफळ असल्याने दररोज सर्वजण तिच्याभोवती असायचे. दर दोन तासाला तिला गायीचे दूध पाजले जायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात घेऊन येथील आया बसायच्या आणि दिवसभर तिची शुश्रूषा केली जात असे. बालसवंगडी तिच्याभोवती एकत्र येऊन टाळ्या वाजवून, तर कोणी खुळखुळा वाजवत. शौर्या... शौर्या... करत खेळवायचे. आया अंगाई गायच्या... यात मग्न होऊन शौर्या त्यांच्या कुशीत मायेची ऊब घेऊन झोपी जायची. दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील एका कुटुंबाने तिला दत्तक घेतले असून, बालसंकुलात वाढलेली शौर्या आता ‘त्या’ कुटुंबात रमली आहे.

सफाई कामगार बनले देवदूत

आईच्या गर्भात अंकुरल्यापासूनच शौर्या ‘नकोशी’ झाली होती. जन्म होताच काही तासांतच तिला कोंडाळ्यात फेकली गेली. आयुष्याचा पहिला दिवस तिच्यासाठी मरणयातना भोगणारा होता. तिच्या अंगावरील जखमा आणि आईच्या दुधाची आस यामुळे ती कितीवेळ जगेल याची शाश्वती नव्हती; पण सफाई कामगार तिच्यासाठी जणू देवदूत बनून आले आणि तिला नवा जन्म मिळाला. ‘देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते या उक्तीची प्रचिती शौर्याने घेतली. वर्षभरापूर्वी कोंडाळ्यात बेवारस होऊन रडणारी शौर्या आज दत्तक पालकांच्या कुशीत आनंदाने हसत, खेळत बागडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news