

कोल्हापूर : कोणतीही निवडणूक आली की धार्मिक सण, उत्सव इच्छुकांसाठी मतदारांच्या जवळ जाण्याकरिता एक मोठे व्यासपीठ मिळते. निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुकांना ती एक पर्वणीच असते. गणेशोत्सवाच्या जल्लोषानंतर सुरू झालेल्या नवरात्रौत्सवानिमित्त उमेदवारांना पुन्हा एकदा मतदारांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली आहे. महिलांच्या मतासाठी गावागावांत नवदुर्गा दर्शनासाठी सहलीचे आयोजन करण्याकरिता इच्छुकांमध्ये चांगलीच स्पर्धा लागली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे भाव मात्र चांगलेच वधारले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जिल्हा परिषदेचे मतदारसंघ निश्चित झाले आहेत. यासंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचसमोर दाखल याचिकेवर सुनावणीह पूर्ण झाली आहे. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मतदारसंघांचे आरक्षण देखील नवरात्रौत्सवानंतर निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या हालचाली आता आणखी गतिमान करण्यास सुरुवात केली आहे. चौकाचौकांमध्ये इच्छुकांनी भाविकांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्यावर नेत्यांच्याही छब्या झळकू लागल्या आहेत. संधीचा लाभ उठवत इच्छुकांनी नवदुर्गा दर्शन सहलींचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.
सजवलेल्या बस, ढोल-ताशांचा गजर, आरती, प्रसाद यामुळे महिलांचा प्रतिसाद.
महिला मतांसाठी नवदुर्गांचा जागर
सहलीच्या नियोजनासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा
प्रवास, नाश्ता, पूजा साहित्याचा पूर्ण खर्च इच्छुकांकडून
मागणी वाढल्याने जीप, टेम्पो भाड्यात लक्षणीय वाढ