

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये घुमणारा नाशिक ढोलचा दमदार आवाज केवळ उत्सवाचा गजर नाही, तर तो नाशिक, जळगाव आणि चाळीसगावच्या शेकडो कलाकारांच्या रोजगाराचा आधार आहे. पोटापाण्यासाठी तब्बल 500 किलोमीटरचा खडतर प्रवास करून हे कलाकार कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी हा सण श्रद्धेइतकाच, आर्थिक रोजगाराची आशा घेऊन येणारा एक महत्त्वाचा किरण ठरतो.
कोल्हापुरात 15 दिवसांचा मुक्काम
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक आणि परिसरातून शेकडो वादक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. हे कलाकार गांधीनगर परिसरात भाड्याने घर घेऊन राहतात आणि व्हिनस कॉर्नर परिसरात थांबून आपल्या पथकासाठी सुपारीची (बुकिंग) वाट पाहतात. येथूनच विविध सार्वजनिक गणेश मंडळे मिरवणुकांसाठी सुपारी देऊन या पथकांना घेऊन जातात. गणपती आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत, सुमारे पंधरा दिवस हे कलाकार कोल्हापुरात मुक्कामी राहून नाशिक ढोलची सेवा देतात. हा उत्सव केवळ वादकांसाठीच नव्हे, तर मूर्तिकार, सजावटकार अशा अनेकांसाठी रोजगाराची मोठी संधी घेऊन येतो, ज्यामुळे हजारो घरांमध्ये आनंदाचा प्रकाश पोहोचतो.