

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. किरण सिद्धाप्पा नाईक (वय 28, रा. नृसिंहवाडी) असे त्याचे नाव असून, या घटनेत सिमेंट उतरवणारे दोन कामगारही गंभीर जखमी झाले आहेत.
औरवाड येथील एका दुकानात आयशर ट्रकमधून सिमेंट उतरवण्याचे काम सुरू होते. यावेळी किरण नाईक दुचाकीवरून वेगाने येत होता. नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी थेट ट्रकच्या मागील भागावर आदळली. यात किरणचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकजवळ उभे असलेले दोन कामगारही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी जखमी कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.