Kolhapur Murder | पैशाच्या वादातून मुलानेच बापाचा घेतला बळी; माजी सैनिकाच्या डोक्यात वार करुन निर्घृण खून!

शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील घटना : ८५ वर्षीय वृद्ध सैनिक
Kolhapur Murder
मृत दत्ताराम संभाजी केसरकर
Published on
Updated on

​विशाळगड : घरातील बॅगेत ठेवलेले पैसे सापडत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात, एका नराधम मुलाने आपल्या ८५ वर्षीय वृद्ध पित्याचा डोक्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उचत (ता. शाहूवाडी) येथे घडली. दत्ताराम संभाजी केसरकर असे मृत माजी सैनिकाचे नाव असून, याप्रकरणी मुलगा संतोष दत्ताराम केसरकर (वय ४०) याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

​ नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, संशयित संतोष केसरकर हा कोल्हापूर येथे नोकरीला असून तो आपले वडील, पत्नी आणि मुलांसह उचत येथे राहत होता. गुरुवारी संतोषने घरात ठेवलेले पैसे मिळत नसल्याच्या कारणावरून पत्नी व कुटुंबीयांशी मोठा वाद घातला. "मी कामावरून परत येईपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर कोणालाही सोडणार नाही," अशी धमकी देऊन तो बाहेर पडला होता.

​गुरुवारी संध्याकाळी संतोषची पत्नी आणि मुले शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी (गॅदरिंग) मलकापूरला गेले होते. घरात वडील दत्ताराम केसरकर हे एकटेच असल्याची संधी साधून संतोषने त्यांच्या डोक्यावर वर्मी घाव घातला. हा हल्ला इतका भीषण होता की, दत्ताराम यांचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला

​खूनानंतर घाबरलेल्या संतोषने फरशीवर सांडलेले रक्त ओढणीने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत संतोषला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

एक प्रामाणिक जीवन आणि दुर्दैवी अंत

​दत्ताराम केसरकर हे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी उचत येथे घर बांधले होते. अतिशय मनमिळाऊ आणि सामाजिक कार्यात सक्रिय असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. नातवांचे शिक्षण आणि कुटुंबाचे भविष्य सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या 'कॅप्टन'चा शेवट स्वतःच्याच मुलाच्या हाताने व्हावा, याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

​ दुर्दैवी योगायोग

दत्ताराम यांना दोन मुले. त्यापैकी एक मुलगा अनेक वर्षांपासून घर सोडून परागंदा आहे, तर सोबत राहिलेल्या दुसऱ्या मुलानेच पैशाच्या हव्यासापोटी वडिलांचा जीव घेतला. या घटनेमुळे मूळ गाव गावडी आणि उचत परिसरात तीव्र संताप व शोक व्यक्त केला जात आहे. घटनेची फिर्याद मृताची सून सौ. साधना संतोष केसरकर यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news