

कोल्हापूर ः मुलगा रोज ऑफिसला सोडतो, आजही नेहमीसारखंच ती मायलेकरं बुलेटवरून निघाली होती. ऑफिस जवळ आलं होतं. पण इतक्यात पावसाची सर आली. पावसात भिजू नये, म्हणून त्यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला. छत्री वार्याने उडाली. ती थांबवण्याचा प्रयत्न करतानाच मीना दिलीप मगदूम (60, रा. मैलखड्डा, संभाजीनगर) यांचा चालत्या बुलेटवरून तोल जाऊन मृत्यू झाला. महाद्वार रोडवर ही घटना घडली.
घरापासून ही मायलेकरं बोलत येत होती. पण काही क्षणात आपल्या आईचा मृत्यू होईल याची कल्पनाही मुलाने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी केली नसेल. महाद्वार रोडवर मंगळवारी सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण मगदूम कुटुंबीयांसह सर्वांच्याच मनाला चटका लावणारी ठरली. कोल्हापूर महापालिकेतील रचना व कार्यपद्धती विभागात शिपाई म्हणून गेली 26 वर्षे नोकरी करणार्या मीना दिलीप मगदूम या शिपाई म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी त्या मुलाच्या बुलेटवर बसून येत होत्या. तेव्हाच पावसाची हलकी सर आली होती. नेहमीसारख्याच सवयीने मीना मगदूम यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात छत्री वार्याने उडाली आणि तोल गेल्याने त्या थेट रस्त्यावर पडल्या. डोक्यावर गंभीर इजा झाली. आजूबाजूचे लोक मदतीला धावले, मुलगा रडतच त्यांना सीपीआर रुग्णालयात घेऊन गेला. पण वेळ निघून गेली होती.
मगदूम या येत्या ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यापूर्वीच काळाने त्यांचं पुस्तकच बंद केलं. त्या समर्पित कर्मचारी, प्रेमळ आई आणि आजी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासकीय कर्तव्य निभावत आयुष्यभर इमानेइतबारे काम करणार्या मीना मगदूम यांचा हा अपघाती मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला आहे. कोल्हापूर महापालिकेतील सहकारी आणि कर्मचारी वर्गातही शोककळा पसरली आहे.
मायलेकरं दररोजच अशाप्रकारे ये-जा करत होती. मुलगा त्यांना सोडायला येत होता. ऑगस्ट महिन्यात त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यानंतर दररोज होणारी ही धावपळ थांबणार होती. पण नियतीला हे काही मान्य नसावं. मंगळवारच्या अपघातात मीना यांचा मृत्यू झाला. मुलगा सोबत असतानाच मुलाच्या डोळ्यासमोरच आईचा मृत्यू झाला.