

कोल्हापूर : दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन कोल्हापूर महापालिका आस्थापना विभागातील महिला कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी महाद्वार रोडवर घडली. मीना दिलीप मगदूम (वय 59, रा. ताराराणी कॉलनी, निर्माण चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
मीना मगदूम सकाळी दहा वाजता मुलगा अक्षय मगदूम याच्या दुचाकीवरून महापालिका कार्यालयात ड्युटीवर येत होत्या. अचानक पाऊस सुरू झाल्याने पर्समधील छत्री काढून उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वार्यामुळे छत्री उलटी झाली. त्यात महिलेचा तोल जावून त्या रस्त्यावर डोक्यावर कोसळल्या. डोक्याला गंभीर इजा झाल्याने बेशुध्द अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर कुटुंबियासह महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचार्यांनी रूग्णालयात गर्दी केली. पतीच्या निधनानंतर त्यांनी तीन मुलांना वाढवून स्वत:च्या पायावर उभे केले. ऑगस्ट 2025 मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. तत्पुर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.