

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचे काम सुरू झाले असून, प्रारूप प्रभागरचना लवकरच अंतिम होणार आहे. 2011 च्या जनगणनेचा तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येचा आधार घेऊन प्रभाग ठरवले जात आहेत. यामुळे उपनगरांतील प्रभागांची मतदारसंख्या लक्षणीय वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मनपाचे उपनगरांतील प्रभाग हे ‘जम्बो’ होणार आहेत.
गावठाण भागात लोकसंख्या आणि मतदारसंख्येत फारसा फरक पडलेला नाही. परंतु उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने मतदारसंख्या ही 4 ते 5 हजारांनी वाढली आहे. परिणामी उपनगरातील प्रभाग मोठे होणार आहेत. अंदाजानुसार एका प्रभागात किमान 28 ते 30 हजार मतदार असतील. शेवटच्या प्रभागात तर 45 हजारांपर्यंत मतदारसंख्या जाण्याची शक्यता आहे. हा प्रभाग दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे नेमके कोणते उपनगर त्या प्रभागात येणार याकडे राजकीय द़ृष्टिकोनातून लक्ष लागून राहिले आहे.
प्रभागांची मांडणी करताना लोकसंख्येचा समतोल राखणे ही निवडणूक आयोगासमोरची मुख्य जबाबदारी आहे. गावठाणातील तुलनेने लहान प्रभाग आणि उपनगरातील मोठ्या प्रभाग यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाचे संतुलन राखणे आवश्यक ठरणार आहे.
महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या प्रारूप प्रभागरचनेवर अभ्यास सुरू असून अंतिम प्रभागनिहाय मतदारसंख्येची आकडेवारी निश्चित झाल्यावर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
शेवटचा प्रभाग सुमारे 45 हजार मतदारसंख्येचा होणार आहे. या प्रभागातून 5 सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभागरचनेची सुरुवात उत्तरेतून पूर्वेकडे करत पश्चिमेकडे सरकत जायचे आहे. त्यानंतर प्रभागांचा शेवट हा दक्षिण दिशेला करायचा आहे. त्यामुळे उपनगरातील एखादा प्रभाग हा शेवटचा ठरणार आहे. गतवेळी राजेंद्रनगर हा शेवटचा प्रभाग होता. यावेळी कोणत्या प्रभागाचा नंबर लागतो, हे पहाणे महत्त्वाचे आहे. महापालिकेच्या सत्तेचा कौल देण्यात तो प्रभाग महत्त्वाचा असल्याने त्यावरच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.
उपनगरातील प्रभाग मोठे होणार असल्यामुळे राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांना येथे अधिक जोर लावावा लागणार आहे. प्रचार व्यवस्था, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि स्थानिक प्रश्नांची हाताळणी, यासोबतच प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये राजकीय हालचाली अधिक गती घेतील, असे दिसून येते.
या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागातून चार सदस्यांची निवड होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना एका प्रभागात अधिक मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. सरासरी एका प्रभागात सुमारे 24 हजार मतदार असावेत, असा संकेत आहे. मात्र उपनगरातील वाढलेली लोकसंख्या पाहता हा आकडा अनेक ठिकाणी 30 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.