

शिवराज सावंत
फुलेवाडी : महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे पक्षीय नेत्यांकडून युती व आघाडी होणार म्हणून घोषणा होत असताना, दुसरीकडे जर खरोखरच युती व आघाडी झाली, तर इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दुसर्या फळीतील इच्छुकांना मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपण कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार, हे अद्याप जाहीर केलेले नाही.
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीअखेर महापालिका निवडणुका घेण्याचा आदेश दिल्यामुळे सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अनेक पक्षांकडे उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे एकाला उमेदवारी देऊन इतरांना गप्प कसे बसवायचे? असा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, दुसर्या फळीतील सर्वच उमेदवार आपल्याला उमेदवारी नाही दिली, तर अन्य पक्षांत जाऊन निवडणूक लढविणार असे सांगत आहेत.
उपनगरातील प्रभाग क्रमांक 9 हा फुलेवाडीसह अंबाई टँक, साने गुरुजी वसाहत, बी. डी. कॉलनी, कनेरकरनगरसह 27,620 मतदारांचा प्रभाग आहे. तर प्रभाग क्रमांक 20 हा गंगाई लॉनपासून कळंबा येथील श्री साई मंदिरापर्यंत 32,121 मतदारांचा, पाच नगरसेवकांचा सर्वात मोठा प्रभाग आहे.
उपनगर परिसरातील अनेक इच्छूक सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींच्या संपर्कात आहेत. मागितलेल्या पक्षाकडून जर तिकीट मिळाले नाही, तर इच्छुकांनीदेखील आपले अन्य मार्ग तयार ठेवल्यामुळे वरिष्ठ नेत्यांची गोची झाली आहे. जर क्रियाशील कार्यकर्ते तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झाले, तर पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी नेत्यांचीसुद्धा चांगलीच पंचायत होणार आहे.
फुलेवाडी व कळंबा रिंगरोड परिसरात अनेक कार्यक्रमांची कारणे काढून वरिष्ठ नेत्यांच्या फेर्या सध्या वाढल्या आहेत. नुकताच कळंबा परिसरात काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आता निवडणुकीची हलगी तापू लागली आहे. तसेच, गद्दारांना सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. एकंदरीत, उपनगर परिसरात इच्छुकांची मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.