कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने शनिवारी मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आल्या. 109 जणांनी मुलाखती दिल्या असून माजी महामौर, माजी उपमहापौर यांच्यासह 26 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. इच्छुकांनी हलगी, घुमक्याच्या वाद्यासह जोरदार शक्तिप्रदर्शन केले. घोषणांमुळे राष्ट्रवादी कार्यालयाचा परिसर दुमदुमला.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, जि.प. माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, उपसमिती सदस्य महेश सावंत, प्रकाश गवंडी यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी दुपारी 2 वाजता मार्केट यार्ड येथील कार्यालयात होत्या. एकपासून इच्छुक समर्थकांसह उपस्थित होते. काही जण हालगी, घुमक्यासह आले तर काही इच्छुक मार्केट यार्डमधील मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीनेच मुलाखतीसाठी आले.
मुलाखती दिलेल्या 109 इच्छुकात माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्यासह 26 माजी नगरसेवक आहेत. त्यात माजी महापौर कादंबरी कवाळे, सुनिता राऊत, हसिना फरास, माधवी गवंडी, उपमहापौर संभाजी देवणे, परिक्षित पन्हाळकर, स्थायी समितीचे माजी सभापती महेश सावंत तसेच रेखा आवळे, प्रकाश कुंभार, प्रकाश गवंडी, राणी संतोष गायकवाड, ज्योती कमलाकर भोपळे, तेजस्वीनी घोरपडे, वंदना आयरेकर, वनिता माने, शारदा देवणे, आदील फरास, नियाज खान, प्रेमा डवरी, संदीप कवाळे, प्रकाश काटे, नंदकुमार गुजर, सुनील पाटील, संतिश लोळगे, अमोल माने या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून उमेदवारी द्या
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून काम करत असून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असतो. प्रभागातही चांगला संपर्क असल्याने उमेदवारी मिळावी, अशी मागणी इच्छुक करत होते. यावेळी मंत्री मुश्रीफ, प्रत्येक इच्छुकाला प्रभाग रचना व प्रभागातील कामासंबंधी विचारत होते.
दोन दिवसांत जागा वाटपाबाबत बैठक : मुश्रीफ
सक्षम उमेदवारांच्या चाचपणीसाठी उपसमिती नेमली आहे. ही समिती आमच्याकडे अहवाल सादर करेल. त्यानंतर महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांची दोन दिवसांत जागा वाटपाबाबतची बैठक होईल. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल त्यामुळे जागा वाटपाबाबत लवकर निर्णय घ्यावाच लागेल, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सत्तेत कसं जायचं हे मला माहीत आहे
जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत बोलण्याचे टाळत असताना मंत्री मुश्रीफ यांनी, गेल्या वीस वर्षांपासून महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे सत्तेत कसं जायच हे मला माहीत असल्याचे सांगितले.