kolhapur Municipal Elections |इच्छुकांची दाटी, बंडखोरीची भीती!

स्वबळाचा नारा दिला, तर महायुती अन् महाविकासची उमेदवार निवडीसाठी डोकेदुखी
Kolhapur Municipal Elections
kolhapur Municipal Elections |इच्छुकांची दाटी, बंडखोरीची भीती!Pudhari File Photo
Published on
Updated on
सतीश सरीकर

कोल्हापूर : चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पक्षीय राजकारणाला बळ मिळणार आहे. प्रत्येक पक्षात इच्छुकांची अक्षरशः गर्दी आहे. अशातच राजकीय पक्षांनी स्वबळाचा नारा दिला, तर उमेदवारी देताना महायुती आणि महाविकास आघाडीला नाकीनऊ येणार आहे. बंडखोरीला ऊत येणार असून हे आव्हान पेलताना दोन्ही आघाड्यांना कसरत करावी लागणार आहे.

महापालिका निवडणुका होऊन तब्बल दहा वर्षे उलटली. वास्तविक 2020 मध्ये निवडणुका होणार म्हणून 2019 नंतर इच्छुकांनी जोरदार तयारी केली होती; परंतु कोरोनाने घात केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे येत गेली आणि निवडणूक लांबत गेली. यंदाच्या वर्षी निवडणुकीला मुहूर्त लागणार आहे. नगरसेवकपदाचे स्वप्न उराशी बाळगून समाजकार्यात उतरलेल्यांना स्वप्नपूर्तीची संधी आली आहे; मात्र आता चार सदस्यीय प्रभाग रचनेने पुन्हा त्यात अडथळे निर्माण केले आहेत. परिणामी, सर्वच पक्षांत बंडखोरी वाढणार आहे.

गेल्या सभागृहातील बहुतांश माजी नगरसेवकांनी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. त्याबरोबरच विविध आरक्षणामुळे निवडणुकीपासून लांब राहावे लागलेल्या इच्छुकांनीही रणांगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. काही माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी आतापासूनच खर्चाची धास्ती घेतली आहे. पूर्वी एक प्रभाग रचना असताना गल्लोगल्ली इच्छुक होते; परंतु आता चार सदस्य प्रभाग रचना असल्याने एकुण खर्चाची गणिते आणि तरुण मंडळे, तालीम संस्था यांना पाच वर्षे सांभाळून ठेवणे याचा हिशेब मांडून इच्छुक आर्थिक विवंचनेत असल्याची चर्चा आहे. परिणामी, प्रत्येक प्रभागात तुल्यबळ व सक्षम उमेदवारांसाठीही नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

...तर उमेदवारांची आवक-जावक

निवडणुकीसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून इच्छुक कामाला लागले आहेत. अनेकांनी लाखाच्या पटीत खर्चही केला आहे. यात सर्व पक्षाच्या इच्छुकांचा समावेश आहे. राज्य पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला, तर कोल्हापूर महापालिकाही त्याला अपवाद ठरणार नाही; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असून उमेदवारी मात्र एकेकालाच मिळणार आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका निर्माण होणार आहे. उमेदवारी न मिळालेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आदी पक्षांतील उमेदवार इकडे-तिकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेची समीकरणेही बदलू शकतात.

प्रबळ उमेदवारांना ‘अच्छे दिन’...

राजकीय पक्षांतून निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी रणांगणात उतरणार आहेत. महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त नगरसेवक निवडूनआणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षातील कारभारी मंडळी त्या - त्या प्रभागातील तगड्या उमेदवारांच्या संपर्कात आहेत. निवडून येऊ शकणार्‍यांना प्राधान्य देऊन त्यांना आपल्याकडूनच लढण्यासाठी गळ घातली जात आहे. प्रसंगी निवडणूक खर्चाचा भार उचलण्याबरोबरच निवडून आणण्याचाही शब्द दिला जात आहे. एकूणच सर्व अर्थाने सक्षम असलेल्या उमेदवारांसाठी पक्षांकडूनच फिल्डिंग लावण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news