

कोल्हापूर : महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. तुल्यबळ आणि सक्षम उमेदवारांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. त्यातूनच शिवसेनेने (शिंदे गट) चक्क काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख व ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांना हायजॅक केले. आ. सतेज पाटील व खा. धनंजय महाडिक यांना हा धक्का मानला जातो. यानंतर माजी नगरसेवकांच्या फोडाफोडीलाही ऊत येणार हे स्पष्ट आहे.
महापालिकेवर 2010 ते 2020 या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कारभाराच्या सर्व चाव्या गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हातात दिल्या होत्या. त्यामुळे पदाधिकारी निवडीत देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरत होती. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढण्यास देशमुख इच्छुक होते. परंतु, काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्याने आमदार पाटील व देशमुख यांच्यात दुरावा निर्माण झाला.
लाटकर यांच्याविरोधात देशमुख यांनी सह्यांची मोहीम राबविल्याने ही दरी वाढली. त्यातच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातही सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा भाजपच्या अमल महाडिक यांनी पराभव केला. परिणामी, सतेज पाटील व देशमुख यांचे राजकीयद़ृष्ट्या वैरत्व आले आहे. त्यामुळे देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचा आधार घेतला. लवकरच समर्थक माजी नगरसेवकांसह ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पारडे जड होते. तरीही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांना शिवसेनेत घेतले. आता त्यांच्यावर महापालिका निवडणुकीतील गणिते जुळविण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु, निवडणुकीची सूत्रे आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडे सोपविली आहेत. राज्य शासनाने प्रभाग रचना करण्याचे आदेश देऊन महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार आपल्याकडे घेण्यासाठी सर्व पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.