Municipal elections | माघारीचा शेवटचा दिवस; दुपारनंतर लढती होणार स्पष्ट

तीन वाजेपर्यंत माघारीसाठीची मुदत; उद्या चिन्ह वाटप
kolhapur municipal elections
Municipal elections | माघारीचा शेवटचा दिवस; दुपारनंतर लढती होणार स्पष्टFile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी चार तासांचा अवधी मिळणार आहे. शुक्रवारी (दि. 2) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय लढती स्पष्ट होणार आहेत. कोण कोण माघार घेतो? कोणाला कोण माघार घ्यायला भाग पाडतो, याकडे लक्ष लागले आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच लढत होईल, असे चित्र असताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची तिसरी आघाडी तर जनसुराज्य शक्ती व रिपब्लिकन पार्टीची आघाडी अस्तित्वात आली आणि त्यांच्यावतीने उमेदवारी अर्जही दाखल झाले. याखेरीज अनेक वर्षे निष्ठावंत असतानाही डावलेल्यांनीही अपक्ष म्हणून शड्डू ठोकत अर्ज दाखल केले. यामुळे अनेक प्रभागांत तिरंगी, चौरंगीही लढती होतील, अशी शक्यता आहे.

महायुती, महाविकास आघाडीत बंड झाले आहे. काहींनी बंडखोरीने अर्ज भरले आहेत. यामुळे काही मातब्बरांची विजयाची गणिते बिघडू शकतात, अशीही परिस्थिती आहे. यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी कंबर कसली आहे. भेटी-गाठी घेऊन, वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधत अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती केली जात आहे. काहींना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन दिले जात आहे, तर काहींना अन्य आश्वासनावर माघारीची गळ घातली जात आहे. काही ठिकाणी साम-दाम-दंड-भेद-नितीचाही अवलंब केला जात आहे. याकरिता गुरुवारची रात्रही अनेकांनी जागवली. यामुळे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत कोण कोण माघार घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.

एकीकडे माघारीसाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे बंडखोरांची, अपक्षांची उमेदवारी कायम राहील, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. काहीही करून माघार घेऊ नका, अशीही मनधरणी काहींना सुरू आहे. तुमच्या उमेदवारींने प्रभागात काय होऊ शकते, प्रसंगी विजयाची माळ तुमच्याच गळ्यात कशी पडू शकते, हे सांगत उमेदवारीवर ठाम राहण्यावरही अनेकजण उमेदवारांना बळ देत आहेत. यामुळे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीसाठी असलेल्या मुदतीत काय होते, त्यावर पुढील चित्र ठरणार आहे.

दुपारी तीन वाजता मुदत संपल्यानंतरच 20 प्रभागातील लढती स्पष्ट होणार आहेत. शनिवारी (दि. 3) सकाळी 11 नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना पक्षाचे चिन्ह मिळेल; मात्र अन्य उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी चिन्ह दिले जाणार आहे. यानंतर खर्‍या अर्थाने प्रचाराचा जोर वाढणार आहे.

कोल्हापूर महापालिका : 48 उमेदवारांची माघार

गुरुवारी तब्बल 48 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सध्या 81 जागांसाठी 759 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये बहुतांश डमी उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news