

सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत रणांगणात उतरणारच, असा निर्धार करून इच्छुकांनी चौकाचौकात बॅनरबाजी केली आहे. राजकीय पक्षांचे चिन्ह आणि नेत्यांचे फोटो लावून स्वतःच उमेदवारी जाहीर केली आहे. महापालिकेच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी एकेक नगरसेवक महत्त्वाचा असल्याने राजकीय पक्षांतही प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आर्थिकद़ृष्ट्या सक्षम, तुल्यबळ आणि साम, दाम, दंड, भेद अशी रणनीती वापरून जिंकणार्या उमेदवारांना पक्षांचे प्रथम प्राधान्य आहे. परिणामी, आधी कुणाचे उघडणार पत्ते? याकडे काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.
खर्या अर्थाने महापालिकेची सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे प्रत्येक प्रभागात निवडून येणार्या एकेका नगरसेवकावर अवलंबून आहे. त्यामुळेच प्रत्येक जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते, तसेच नवखे चेहरे हे सर्वच तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांशी संपर्क साधत आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप आचारसंहिता लागू केली नसली, तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
काँग्रेसने काही प्रभागांमध्ये आपले पारंपरिक बालेकिल्ले शाबूत ठेवण्यासाठी संघटनबांधणी सुरू केली आहे. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच नव्या चेहर्यांनाही संधी देण्यावर विचार सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही शहरात जोरदार तयारी सुरू असून, कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पारंपरिक मतदारांवर लक्ष केंद्रित करत निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भाजपकडून निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली जात आहे. संघटनात्मक ताकद, बूथ पातळीवरील नियोजन आणि सोशल मीडियावर आक्रमक प्रचार यावर भाजपचा अधिक भर असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यातील स्पर्धाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही गटांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी, आर्थिक ताकदीची पडताळणी आणि स्थानिक प्रभाव असलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवला जात आहे. ठाकरे सेना मात्र चाचपडत आहे.
सध्या राजकीय वर्तुळात सर्वात मोठी चर्चा आहे, ती म्हणजे उमेदवारीचे पत्ते आधी कोण उघडणार? प्रत्येक पक्षाची रणनीती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी अंतर्गत बैठका, गुप्त चर्चा आणि नेत्यांचे दौरे वाढले आहेत. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तिकिटासाठी चुरस निर्माण झाली असून, बंडखोरीचे पडसाद उमटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय पक्षांनीही यंदा केवळ लोकप्रियतेच्या जोरावर नव्हे, तर जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. आर्थिकद़ृष्ट्या सक्षम, संघटनात्मक ताकद असलेले, तसेच मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर भर आहे. महापालिकेची सत्ता हा केवळ विकासाचा प्रश्न नसून तो प्रतिष्ठेचा आणि राजकीय वर्चस्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळेच येत्या काळात प्रचाराची तीव—ता वाढणार असून, आरोप-प्रत्यारोप, आरोपांची फैरफट, तसेच राजकीय आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.