Kolhapur Municipal Elections : एकाच प्रभागात चौघांना संधी, युती की आघाडी कोणाची चांदी?

कोल्हापूरकर पहिल्यांदाच करणार एकाच प्रभागात चार उमेदवारांना मतदान
Kolhapur Municipal Elections
Kolhapur Municipal Elections : एकाच प्रभागात चौघांना संधी, युती की आघाडी कोणाची चांदी?Pudhari File Photo
Published on
Updated on
सतीश सरीकर

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पक्षीय पातळीवर सर्वच तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. महापालिका स्थापनेपासूनच्या इतिहासात कोल्हापूरकर पहिल्यांदाच चार-चार उमेदवारांना मतदान करणार आहेत. विधानसभेला महायुतीला साथ देणार्‍या कोल्हापूरकरांनी महापालिकेत कधीही भाजप, शिवसेनेच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपविलेल्या नाहीत. सध्या कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज हे काँग्रेसचे आहेत. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे, तर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे भाजपचे आहेत. परिणामी, चार सदस्य प्रभागाचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महाविकास आघाडीमध्ये सद्यस्थितीत काँग्रेस प्रबळ आहे. जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील हे नेतृत्व करत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे अस्तित्व नावापुरते आहे. परिणामी, आघाडीची सारी मदार काँग्रेसवरच आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असला, तरी सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गट स्ट्राँग आहे. 2015 च्या निवडणुकीत भाजपने आघाडी करून लढविलेल्या ताराराणी आघाडीचे बहुतांश माजी नगरसेवक आता शिंदे गटात आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकदही चांगली आहे. मात्र, महापालिकेची निवडणूक गल्लीतील असते. त्यामुळे पक्षाबरोबरच त्या उमेदवाराची जनतेबरोबर नाळ किती जुळलेली आहे यावर मतदान ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीत सुमारे 22 हजार ते 24 हजार मतदारांचा एक प्रभाग होणार आहे. यापूर्वी गल्लीतील राजकारण खेळलेल्या माजी नगरसेवकांची चार प्रभागांपर्यंत पोहोचताना दमछाक होणार आहे. बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने 81 नगरसेवकांसाठी 20 किंवा 21 प्रभाग होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी 4 सदस्यांचा एक याप्रमाणे 20 आणि एका सदस्यासाठी 1 असे किंवा शेवटचा प्रभाग 5 सदस्यांचा होऊ शकतो. कोल्हापूर शहरातील मतदार पहिल्यांदाच चार उमेदवारांना मतदान करणार आहेत. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आहे. त्यातच भाजपचा आणि महायुतीला मानणारा एकगठ्ठा मतदान आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदान लक्षणीय आहे.

निवडणूकनिहाय मतदारांची वेगवेगळी भूमिका

कोल्हापूरकरांचे राजकारण कुणाला कळत नाही, असे म्हटले जाते. इथले मतदार कुणाला निवडून आणायचे, त्याऐवजी कुणाला पाडायचे? हे ठरवत असतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेला राजकीय परिस्थिती वेगळी असते. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ स्थापनेपासून शिवसेनेला भगवा फडकविण्यासाठी साथ देणार्‍या मतदारांनी महापालिका निवडणुकीत कधीही शिवसेनेला सत्ता दिली नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हात देणार्‍या मतदारांनी आता गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेला निवडून दिल्लीला पाठविले आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदार महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवू देत असल्याचे वास्तव आहे. अशाप्रकारे कोल्हापूरकर मतदारांची निवडणूकनिहाय वेगवेगळी भूमिका असते.

युती अन् आघाडीत जागावाटपाचा तिढा...

महापालिकेत पक्षीय राजकारणापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक हे अपक्षांची मोट बांधून सत्तेची चावी आपल्या हाती ठेवत होते. कालांतराने त्यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून राजकारण सुरू केले; पण रिमोट कंट्रोल आपल्याच हाती ठेवला. 2010 ते 2020 या दहा वर्षांत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी हातमिळवणी करून महापालिकेची सत्ता काबीज केली. आता राज्याच्या राजकारणाचा महापालिकेच्या राजकारणावरही परिणाम झाला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीकडे इच्छुकांचा ओढा आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिंदे शिवसेनेकडे अनेकांचा कल आहे. त्यानुसार अनेकजण पक्ष प्रवेश करणार आहेत. भाजपचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षांना किती जागा देणार? हा प्रश्न आहे. परिणामी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news