

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे. सर्वच नेतेमंडळी आपल्या पक्षाचा सत्तेचा झेंडा महापालिकेवर फडकविण्यासाठी आतूर झाले आहेत; मात्र त्यासाठी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची गरज भासणार आहे. परिणामी, नेत्यांनी पत्ते टाकायला सुरुवात केली आहे. तुल्यबळ उमेदवार आपल्याकडे यावेत, यासाठी डावपेच आखले जात आहेत. साम, दाम, दंड आदी कारणांनी सक्षम असलेल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी रेड कार्पेट टाकत आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे.
काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली 2010 पासून महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. त्याचे पडसाद कोल्हापूरच्या राजकारणातही उमटले आहेत. त्यामुळे कोण कोणासोबत हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र आपल्या तंबूतील माजी नगरसेवक आपल्याच सोबत असल्याचे भासविले जात आहे. निवडणूक जवळ येईल तसे फोडाफोडीत रंगत भरणार आहे.
सद्य:स्थितीत काँग्रेसकडे म्हणजेच आ. सतेज पाटील यांच्याकडे माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महाविकास आघाडी कार्यरत आहे. मात्र महापालिकेच्या सत्तेतील त्यांचे मित्र मंत्री मुश्रीफ आता महाविकास आघाडीच्या गोटात आहेत. परिणामी यंदाच्या निवडणुकीत किंवा महापालिकेच्या सत्तेत आ. पाटील व मंत्री मुश्रीफ एकत्र नसतील हे स्पष्ट आहे. तसेच काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद अगदीच नगण्य आहे. परिणामी शिवसेना ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसचे नेते जागा सोडणार का, असा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती लढवेल. अन्यथा निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी केली जाण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. साहजिकच या सत्ताधारी पक्षांतून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमधीलही अनेकजण इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाची धुरा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आहे. भाजपची सर्व सूत्रे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्याबरोबरच जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही शहरात माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र महायुती म्हणून तीनही पक्ष महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास त्याचा फायदा होणार आहे.
काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु भाजप, शिवसेनेने काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढले आहे. सद्य:स्थितीत आमदार, खासदारही भाजप-शिवसेनेचेच आहेत. परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात माजी नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. काँग्रेसने आपल्या पक्षाच्या माजी नगरसेवकांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी डिनर डिप्लोमसीचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे इतर पक्षाकडूनही डिनर डिप्लोमसी सुरू झाली आहे. डिनर डिप्लोमसीला न येणार्यांचे रुसवे-फुगवे काढण्यासाठी नेतेमंडळीचे कारभारी कामाला लागले आहेत.