

डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थरारक सामना रंगण्याची चिन्हे आहेत; मात्र रणसंग्रामाआधीच महायुतीतील तीन घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागा वाटपावरून तणाव वाढू लागला आहे.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी 35-35 जागांवर दावा ठोकल्याने राष्ट्रवादीला फक्त 11 जागा देण्याची चर्चा पुढे येत आहे. यामुळे अजित पवार गटात नाराजी वाढली असून काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा स्वतंत्र उमेदवारीचा पर्यायही चर्चेत आल्याचे बोलले जात आहे. 20 प्रभागांमधून 81 जागांसाठी शर्यत आहे. यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होत असून शहरातील 20 प्रभागांतून 81 नगरसेवकांची निवड होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वच पक्षांनी या प्रभागांमध्ये आपली ताकद रुजवण्याचे काम केले. पक्षांतराची लाट, विद्यमान नगरसेवकांची मोडतोड आणि नव्या चेहर्यांची शोधमोहीम या सर्वांमुळे राजकीय वातावरणात चांगलीच धग निर्माण झाली होती.
दावे मजबूत; पण समझोता अधांतरी
गतनिवडणुकीत भाजपला 13, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 14 जागा मिळाल्या होत्या. गेल्या 15 वर्षांत महापालिकेच्या सत्तेत 50 टक्के वाटा राखल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना 11 ते 15 जागा देण्याचा प्रस्ताव पक्षातील अनेकांना मान्य नसून ‘ताकदीप्रमाणे सन्मान’ हा त्यांचा आग्रह आहे. एकंदरीत पाहता जागा वाटपाचा मुद्दा महायुतीत ठिणगी टाकू शकतो. मानसन्मासाठी सर्वच पक्षांची स्वतंत्र लढण्याची तयारीही तळागाळापर्यंत जाणवत आहे.
पक्ष प्रवेशाच्या कमिटमेंट पूर्ण करण्याचे आव्हान
महापालिकेच्या काही प्रभागात एकाच कुटंबातील दोघांना दोन जागा देण्याची कमिटमेंट राजकीय पक्षांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी केली होती. आता ही कमिटमेंट पाळताना राजकीय पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एका प्रभागात चार जागा आहेत. यापैकी दोन जागा घटक पक्षातील एकाच पक्षाला आणि एकाच कुटुंबात देण्याचे मोठे शिवधनुष्य राजकीय पक्षांना पेलावे लागणार आहे. महायुतीतील कोणताही घटक पक्ष न दुखावता ही किमया राजकीय पक्षांना पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची नाराजी कशी दूर करायची, त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, याचा स्वतंत्र आराखडा राजकीय पक्षांकडून केला जात आहे.